जिनपिंग यांच्या राजवटीने तालिबानचे समर्थन सुरू केल्यामुळे चीनची जनता अस्वस्थ

चीनची जनताबीजिंग/काबुल – चीनची सत्ताधारी राजवट व प्रसारमाध्यमे तालिबान हा चीनचा भागीदार ठरु शकतो, असे चित्र उभे करण्याचे आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र या प्रयत्नांवर चिनी जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून सोशल मीडियावर नाराजी दर्शविणाऱ्या पोस्ट प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. तालिबानची हिंसक व दहशतवादी पार्श्‍वभूमी व त्यांच्याकडून महिलांवर होणारे अत्याचार हे मुद्दे चिनी नेटिझन्सकडून आक्रमकरित्या उपस्थित करण्यात आले असून, ही बाब कम्युनिस्ट राजवटीला अडचणीत आणणारी ठरु शकते, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्याचे जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी, अफगाणिस्तानमधील नव्या राजवटीशी मैत्रीपूर्ण व सहकार्याचे संबंध ठेवण्यास चीन उत्सुक असल्याचे म्हटले होते. चीनचे राजनैतिक अधिकारी तसेच सरकारी प्रसारमाध्यमांनीही त्यानंतर तालिबान अफगाणी नागरिकांनी निवडलेला पर्याय आहे व बदलला आहे, अशा स्वरुपाचा प्रचार सुरू केला होता. कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र असणाऱ्या ‘पीपल्स डेलि’ने तालिबानसंदर्भात एक मिनिटाचा व्हिडिओदेखील प्रसिद्ध केला होता. या संपूर्ण व्हिडिओत तालिबानच्या दहशतवादाचा अजिबात उल्लेख नव्हता.

चीनमधील सोशल मीडिया वेबसाईट ‘वायबो’वर हा व्हिडिओ व्हायरल झाला व त्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या. चीनच्या अनेक नेटिझन्सनी तालिबानच्या हिंसक इतिहासाची आठवण करून दिली. काहींनी तालिबानने पाडलेल्या बामियान येथील गौतम बुद्धांच्या मुर्तीचा उल्लेख करून तालिबानच्या मानसिकतेची जाणीव करून दिली. तालिबानने महिलांना शिक्षण घेण्यापासून व काम करण्यापासून रोखले आहे, याकडेही चिनी नेटिझन्सनी लक्ष वेधले. ‘वुई चॅट’ या वेबसाईटवर तालिबानवर शंका घेणारा एक लेखही प्रसिद्ध करण्यात आला.

‘इज तालिबान द चॉईस ऑफ अफगाणिस्तान पीपल?’ नावाच्या लेखाला एक लाखांहून अधिक ‘व्ह्यूज’ मिळाले. अफगाणिस्तानमधील एका महिला चित्रपट दिग्दर्शिकेने प्रसिद्ध केलेले आवाहन चीनमधील सोशल मीडियावरून काढून टाकण्यावरही तीव्र प्रतिक्रिया उमटली. सोशल मीडियावर अनेक महिलांनी सत्ताधारी राजवटीवर, तुम्ही अफगाण महिलांचा आवाज दाबून टाकत आहात, असा आरोप केला. चीनशी निगडित काही विश्‍लेषकही सत्ताधारी राजवटीकडून तालिबानशी सहकार्य करण्याबाबत घाई केली जात असल्याचे सांगून त्यावर नाराजी व्यक्त करीत आहेत.

अमेरिकी वेबसाईट ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या एका वृत्तात, अफगाणिस्तानमधील सहभाग वाढविणे व तालिबानी राजवटीला सहकार्य करणे चीनच्या ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’ योजनेसाठी धोकादायक ठरु शकते, असे बजावले होते. अफगाणिस्तानात तालिबान स्थिर झाल्यास पाकिस्तानमधील दहशतवादी गटांना बळ मिळेल व पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढेल, असे सांगण्यात येते. तर कॅनडाच्या ‘द इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स ॲण्ड सिक्युरिटी’ या अभ्यासगटाने तालिबानच्या राजवटीच्या काळात, झिंजिआंग प्रांतातील उघुरवंशियांची ‘द ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुव्हमेंट’(इटीआयएएम) ही संघटना चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरु शकतो, असा इशाराही दिला होता. गेल्या महिन्यात तालिबानी शिष्टमंडळाने चीनला दिलेल्या भेटीत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यासंदर्भातील चिंता व्यक्त करून तालिबानकडून आश्‍वासन मिळविल्याचेही सांगण्यात येते.

leave a reply