हंटर बायडेनच्या लॅपटॉप घोटाळ्यात ‘सीआयए’चा सहभाग होता

- प्रतिनिधीगृहाच्या न्यायिक समितीचा अहवाल

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्याभोवती अमेरिकन संसदेच्या प्रतिनिधीगृहाने चौकशीचे सत्र सुरू केले आहे. 2020 सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, हंटर बायडेन याच्या लॅपटॉप संदर्भातील घोटाळा दडविण्यासाठी अमेरिकेची मुख्य गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ सहभागी होती, अशी माहिती प्रतिनिधीगृहाच्या न्यायिक समितीने आपल्या अहवालात प्रसिद्ध केली. त्याचबरोबर ज्यो बायडेन यांना निवडणूक जिंकविण्यासाठी सीआयएचे माजी संचालक माईक मॉरेल आणि विद्यमान परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप सीआयएच्या माजी अधिकाऱ्यानेच केला.

हंटर बायडेनच्या लॅपटॉप घोटाळ्यात ‘सीआयए’चा सहभाग होता - प्रतिनिधीगृहाच्या न्यायिक समितीचा अहवाल2020 सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीआधी तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. ज्यो बायडेन यांना डेमोक्रॅट पक्षातूनच समर्थन मिळत नसल्याचे समोर आले होते. त्यावेळी बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेनच्या वादग्रस्त लॅपटॉपची माहिती समोर आली होती. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क पोस्ट’ या दैनिकाने यासंदर्भात विस्तृत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र त्यानंतर काही दिवसांनीच अमेरिकेतील इतर माध्यमांनी हंटर बायडेनचा लॅपटॉप हा रशियाने राबविलेल्या अपप्रचार मोहिमेचा भाग असल्याचे दावे केले.

ट्रम्प यांना निवडणूकीत विजय मिळवून देण्यासाठी रशिया बायडेन यांच्याविरोधात अपप्रचार करीत असल्याचा दावा सीआयएच्या जवळपास 50 माजी गुप्तचर अधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे केला होता. या पत्रामुळे अमेरिकेतील निवडणूकीत बायडेन यांनी ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण निर्मिती केली व याचा फायदा त्यांना निवडणूकीच्या निकालात झाला. पण सीआयएचे माजी संचालक माईक मॉरेल यांनी हंटर बायडेनच्या समर्थनार्थ असलेल्या या पत्रात स्वाक्षरी करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा खुलासा माजी अधिकारी डेव्हिड कॅरीयन्स यांनी केला.

काही दिवसांपूर्वी मॉरेल यांनी संसदेच्या चौकशी समितीसमोर याची कबुली दिली होती. तर कॅरीयन्स यांच्याप्रमाणेच सीआयएच्या आणखी एका माजी अधिकाऱ्याने बायडेनप्रकरणी मॉरेल यांच्याबरोबरच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्यावरही आरोप केले आहेत. ज्यो बायडेन यांना निवडणूक जिंकवून देण्यासाठी ब्लिंकन यांनीच रशियाविरोधी अपप्रचाराचा कट रचला होता, असा ठपका या अधिकाऱ्याने ठेवला.

दरम्यान, हंटर बायडेन तसेच ज्यो बायडेन यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी आर्थिक सहकार्य असल्याची चौकशीही प्रतिनिधीगृहात सुरू झाली आहे.

हिंदी English

 

leave a reply