ड्युरंड लाईनवर तालिबान आणि पाकिस्तानी लष्कराचा संघर्ष

तालिबान आणि पाकिस्तानीकाबुल/इस्लामाबाद – अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला विभागणार्‍या ड्युरंड लाईनवरुन तालिबान आणि पाकिस्तानी लष्करात नवा संघर्ष भडकला. पाकिस्तानच्या चमन सीमेवर पेटलेल्या या संघर्षात तीन ठार, तर २० जण जखमी झाले. तर तालिबानने पाकिस्तानच्या दोन जवानांन ताब्यात घेतल्याचे फोटोग्राफ्स समोर आले आहेत. पाकिस्तानच्या जवानांनी सर्वप्रथम गोळीबार सुरू केल्याचा आरोप तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने केला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तानचे लष्कर ड्युरंड लाईनवर सतत उल्लंघन करीत असल्याचा ठपका तालिबानने ठेवला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अफगाणिस्तानच्या कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्दाक तर पाकिस्तानच्या बलोचिस्तान येथील चमन सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानी जवानांमध्ये संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानचे लष्कर चमन सीमेवर नवी सुरक्षा चौकी उभारत असल्याचा आरोप तालिबान करीत आहे. ती सुरक्षा चौकी अफगाणिस्तानच्या हद्दीत असल्याचा दावा करून तालिबानने पाकिस्तानी लष्कराला पिटाळून लावले. त्याचबरोबर हम्वी या अमेरिकन लष्कराच्या चिलखती वाहनात बसून तालिबानने पाकिस्तानच्या हद्दीत सैर केली. यानंतर पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या हद्दीत गोळीबार सुरू केल्याचा आरोप तालिबानने केला. त्यानंतर भडकलेल्या तालिबानने पाकिस्तानच्या हद्दीत मॉटर्सचा हल्ला चढविल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमे देत आहेत.

यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे तीन जवान ठार झाले, तर दोन्ही बाजूचे २० जण जखमी झाल्याचा दावा केला जातो. त्याशिवाय तालिबानने पाकिस्तानी लष्कराच्या दोन जवानांना अटक केली असून त्यांचे लष्करी पोशाखातील फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याचेही टाळत आहेत. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने सोशल मीडियावरून स्पिन बोल्दाक येथील संघर्षाची माहिती दिल्यानंतर पाकिस्तानी माध्यमांना याची दखल घ्यावी लागली. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तालिबानच्या स्थानिक कमांडरने पाकिस्तानला नवी धमकी दिली आहे. लवकरच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत आपण तालिबानचा झेंडा फडकवू, असे या तालिबानच्या कमांडरने बजावले आहे.

या घटनेनंतर तालिबानमधील बद्र या गटाने स्पिन बोल्दाक सीमेची जबाबदारी ताब्यात घेतल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिकन स्पेशल फोर्सेसच्या धर्तीवर तालिबानने बद्र या गटाची उभारणी केली आहे. अमेरिकन लष्कराने माघारी सोडलेल्या प्रगत रायफल्स आणि शस्त्रास्त्रांचा वापर करून बद्र ही संघटना उभारण्यात आल्याचा दावा केला जातो. या संघटनेच्या उभारणी मागे पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे योगदान असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यामुळे तालिबानने पाकिस्तानी सैन्याविरोधातच बद्र संघटना तैनात केल्यामुळे पाकिस्तानी माध्यमे आपल्याच देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर ताशेरे ओढत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराकडून अफगाणिस्तानच्या हद्दीतील गोळीबाराच्या घटना वाढल्याची टीका तालिबानने केली आहे. त्यासाठी तालिबानने जानेवारी महिन्यापासूनच्या वेगवेगळ्या घटनांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये कंदाहारसह पाकतिया, नांगरहार या पाकिस्तानच्या सीमेला भिडलेल्या अफगाणी प्रांतांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांचा दाखला तालिबानने दिला. इतकेच नाही तर पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा ठपकाही तालिबानने ठेवला आहे. तालिबानचे हे नवे आरोप पाकिस्तानसाठी मोठा झटका ठरतात.

leave a reply