भारतीय सैन्याच्या कारवाईच्या धास्तीने चीनकडून आपल्या नियंत्रणाखालील भागात पुलाची उभारणी

नवी दिल्ली – लडाखच्या पँगाँग सरोवराच्या आपल्या नियंत्रणात असलेल्या एलएसीवरील भागात चीनचे लष्कर पुलाची उभारणी करीत आहे. 2020 सालच्या ऑगस्ट महिन्यात भारतीय सैन्याने चीनचे जवान समोर उभे असताना, या क्षेत्रातील टेकड्यांचा ताबा घेतला होता. याने भयचकीत झालेले चीनचे लष्कर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सदर पुलाचे बांधकाम करीत असल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी म्हटले आहे.

भारतीय सैन्याच्या कारवाईच्या धास्तीने चीनकडून आपल्या नियंत्रणाखालील भागात पुलाची उभारणी2020 सालच्या मे महिन्यापासून चीनने लडाखच्या एलएसीवरील दक्षिणेकडील भागात घुसखोरी केली होती. वारंवार आवाहन व इशारे देऊनही चीनने इथली तैनाती मागे घेतली नव्हती. यानंतर भारतीय सैन्याने चीनला जबर धक्का दिला. रेचिंग ला, ब्लॅक टॉप, हॉट स्प्रिंग आणि रेकीन ला या मोक्याच्या टेकड्यांचा ताबाघेऊन भारतीय सैन्याने चिनी लष्कराला हादरवून सोडले होते. भारतीय सैन्याची ही कारवाई पाहून स्तिमित झालेल्या चिनी जवानांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला खरा. पण त्यांचे भारतीय सैन्यासमोर काही चालले नाही. पुढच्या काळातही चिनी जवानांनी ह्या टेकड्या भारतीय सैन्याकडून घेण्याच्या हालचाली केल्या होत्या. मात्र याचे गंभीर परिणाम होतील, असे सज्जड इशारे भारतीय सैन्याने दिल्यानंतर चिनी लष्कराला माघार घ्यावी लागली होती.

भारतीय सैन्याच्या या कारवायांमुळे चीनला नाक मुठीत धरून लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चा करण्याची तयारी दाखवावी लागली. इतकेच नाही तर पुढच्या काळात चीनच्या लष्कराने इथल्या एलएसीवरून माघार घेतली होती. इथल्या काही ठिकाणी अजूनही चीनचे जवान तैनात असले तरी त्यावर भारतीय सैन्याची करडी नजर रोखलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय सैन्याने 2020च्या ऑगस्ट महिन्यात केलेल्या कारवाईचा धसका चीनने घेतला आहे. भारतीय सैन्य आवश्‍यकता भासल्यास पुन्हा अशी कारवाई करू शकेल, असे संकेत भारताच्या सैन्याकडून दिले जात आहेत. अशा परिस्थितीत, चीन पँगाँग सरोवर क्षेत्रात आपले नियंत्रण असलेल्या खुर्नाक भागात पुलाची उभारणी करीत आहे.

या पुलामुळे चिनी लष्कराला अधिक वेगाने तैनाती व कारवाई करणे शक्य होईल. त्याचवेळी सध्या हा भाग चीनच्या नियंत्रणात असल्याने त्यावर थेट आक्षेप नोंदविणे भारतासाठीही अवघड जाईल. गेल्या काही महिन्यांपासून भारताने सीमाभागातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा धडाका लावला आहे. यानुसार लेह-लडाखसह चीनच्या एलएसीजवळील भागात मोठ्या प्रमाणात रस्ते व पूल विकसित करण्यात येत आहेत. भारताचे हे प्रकल्प चीनच्या चिंतेत भर घालत आहेत. यामुळे भारताच्ा सैन्याची जलदगतीने कारवाई करण्याची क्षमता अधिकच वाढणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, चीनने खुर्नाक क्षेत्रात पुलाचे बांधकाम सुरू केल्याचे दिसते. मात्र या पुलाची उभारणी करीत असताना, आपण भारताच्या विरोधात मोठी कारवाई करीत असल्याचा आभास चीनकडून निर्माण केला जात आहे.

लडाखच्या गलवान खोऱ्यात आपला राष्ट्रध्वज फडकावून नव्या वर्षाचे स्वागत केल्याचे दावे करणारे फोटोग्राफ्स चीनने प्रसिद्ध केले होते. पण हे फोटोग्राफ्स चीनच्या नियंत्रणातील भागातले असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली. यामुळे चीन भारतीय लष्करावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुन्हा एकदा उघडझाले. आधीच्या काळातही चीनने अशा स्वरुपाचे प्रयत्न केले होते. पण प्रत्यक्षात एलएसीवर भारतीय सैन्याच्या हालचाली व इथे विकसित केल्या जात असलेल्या पायाभूत सुविधा हा चीनच्या चिंतेचा विषय बनल्याचे दिसत आहे.

leave a reply