आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत – अमेरिकेच्या ‘युएसआयएआय’ची स्थापना

नवी दिल्ली – ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ अर्थात एआय क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘इंडो-युएस सायन्स अँड टेक्नॉलॉजी फोरम’ने (आययुएसएसटीएफ) यासाठी ‘युएस इंडिया आर्टिफिशल इंटेलिजन्स इनिशिएटिव्ह’च्या (युएसआयएआय) स्थापनेची घोषणा केली. आर्टिफिशल इंटेलिजन्स क्षेत्रातील उभय देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी ‘युएसआयएआय’ची स्थापना करण्यात आल्याचे भारताच्या ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ने म्हटले आहे.

‘आर्टिफिशल इंटेलिजन्स-एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. पुढच्या काळात एआयमध्ये अग्रेसर असणारा देश जगावर अधिराज्य गाजविल, असे दावे केले जातात. जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर होईल आणि देशाच्या संंरक्षणापासून ते दैनंदिन जीवनातील गोष्टींमध्ये एआय अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडेल, असे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदविले जात आहेत. जगभरातील प्रमुख देश एआयसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असून यासाठीच्या संशोधनाला चालना देत आहेत. अशा परिस्थितीत भारत व अमेरिकेमध्ये एआयच्या संदर्भात होत असलेले हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.

भारताच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सचिव आशुतोष शर्मा यांनी उभय देशांमध्ये होत असलेल्या या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारत व अमेरिकेसमोर खड्या ठाकलेल्या समस्या दूर करण्यासाठी तसेच विकासाच्या मार्गात येणार्‍या अडथळ्यांवर मात करण्यासाठी हे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे शर्मा म्हणाले. देशात एआयच्या विकासासाठी २५ टेक्नॉलॉजी हब अर्थात केंद्रे विकसित करण्यात आली आहेत, अशी माहितीही यावेळी आशुतोष शर्मा यांनी दिली.

अमेरिकेच्या ‘ओशन अँड इंटरनॅशनल एन्व्हार्यन्मेंटल अँड सायंटिफिक अफेअर्स’चे उपमंत्री जोनाथन मार्गोलिस यांनी भारताबरोबरील अमेरिकेच्या या सहकार्याचे स्वागत केले. लोकशाहीवादी देशांमधील हे सहकार्य खुलेपणा, पारदर्शकता आणि सामंजस्य तसेच संशोधनाला प्रोत्साहन या मुद्यांवर आधारलेले आहे, असे मार्गोलिस म्हणाले. भारत आणि अमेरिका हे दोन मोठे लोकशाहीवादी देश एकत्र येऊन चमत्कार घडवू शकतील. म्हणूनच एआय क्षेत्रातील भारत आणि अमेरिकेच्या सहकार्याची सुरूवात करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ ठरते, असा दावा भारताच्या ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन’चे संचालक सेतूरामन ‘पंच’ पंचनाथन यांनी केला आहे.

दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना गती देण्यासाठी तसेच रोजगारनिर्मितीद्वारे समृद्धीसाठी भारत व अमेरिकेमधील हे सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते, असा दावा पंचनाथन यांनी केला. जागतिक लोकसंख्येपैकी २० टक्के इतका हिस्सा असलेल्या भारताच्या सहभागाखेरीज कुठलेही संशोधन अपूर्ण असेल, असे एक्सिलर व्हेंचर्स या कंपनीचे अध्यक्ष ख्रिस गोपालकृष्णन यांनी म्हटले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आघाडीवर भारत व अमेरिकेमध्ये सहकार्य प्रस्थापित करून ‘आययुएसएसटीएफ’ने आपले अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे, असा दावा ‘युएसआयएआय’च्या कार्यकारी संचालिका नंदिनी कन्नन यांनी केला आहे.

leave a reply