देशातील कोरोना रुग्णांची संख्या १४ लाखांवर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४ लाख ३५ हजारांवर गेली आहे. केवळ तीन दिवसात देशात सुमारे दीड लाख नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी देशात कोरोनाच्या तब्बल ४ लाख ४० हजार चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तसेच एकाच दिवसात ३६ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले. रविवारीही तितक्याच कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचे दिलासादायक वृत्त आहे. मात्र देशभरात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या

रविवारी सलग चौथ्या दिवशी देशात सुमारे ४९ हजार रुग्ण आढळले आहेत. चोवीस तासात महाराष्ट्रात २९८ जणांचा बळी गेला, तसेच ९ हजार ४३१ नवे रुग्ण आढळले. यामुळे महाराष्ट्रातील आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या पावणे चार लाखांच्या पुढे गेली आहे. मुंबईत ५७ जणांचा बळी गेला असून १,११५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

आंध्र प्रदेशात एका दिवसात ७,९२७ नवे रुग्ण सापडले आहेत आणि ५६ जण दगावले आहेत. तामिळनाडूत दिवसभरात ८५ जणांचा कोरोनाने बळी गेला असून ६८८६ नवे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात चोवीस तासात ८२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तसेच ५,१९९ नवे रुग्ण आढळले. उत्तरप्रदेशातही चोविस तासात नव्या रुग्णांचा उच्चांक नोंदविण्यात आला. या राज्यात चोवीस तासात ३२६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

leave a reply