देशातील ११ राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

परिस्थिती चिंताजनकनवी दिल्ली – देशात महाराष्ट्रासह एकूण ११ राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून परिस्थिती चिंताजनक असल्याचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी म्हटले आहे. देशात अतिशय वेगाने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर एक उच्चस्तरीय आढावा बैठक शुक्रवारी पार पडली. त्यानंतर गौबा बोलत होते. देशात कोरोनाच्या वाढीचा सध्या दर ६.६ टक्क्यांवर हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. तसेच दरदिवशी या साथीने होणार्‍या मृत्युचा दर ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गुरुवारपासून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात देशात ८१ हजाराहून अधिक रुग्णांची नोंेद झाली. गेल्या सहा महिन्यातील एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.

देेेशात २ ऑक्टोबरनंतर चोवीस तासात कोरोनाच्या सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच एका दिवसात ४६९ जणांचा बळीही गेला आहे. ६ डिसेंबरनंतरही सर्वाधिक एका दिवसात कोरोनाने गेलेले हे सर्वाधिक बळी आहेत. यामुळे देेशात आतापर्यंत कोरोनाच्या साथीने दगावलेल्यांची संख्या १ लाख ६३ हजारांवर पोहोचली आहे.

महाराष्ट्र, तमिळनाडू, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये कोरोनाचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहेत. या राज्यांमध्ये सामुहिक संक्रमण अद्याप दिसून आलेले नाही. मात्र परिस्थिती चिंताजनक आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. कोरोनाचे हे वाढते संक्रमण रोखण्यासाठी तातडीने उपायांची व नियमांच्या कडक अंमलबजावणीची आवश्यकता आहे. कोरोनाचे ९० टक्के नवे रुग्ण आणि या साथीने होणारे ९० टक्के मृत्यू या ११ राज्यांमध्येच होत असल्याकडे सरकारने लक्ष वेधले आहे.

टू टायर आणि थ्री टायर शहरांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. या शहरांमधून ग्रामीण क्षेत्रात संक्रमण वाढण्याचा धोका असून यामुळे तेथील कमकुवत आरोग्य यंत्रणांना हा भार सहन होणार नाही, अशी भितीही शुक्रवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त करण्यात आली.

कोरोनाचे संक्रमण वाढत असलेल्या राज्यांनी कंटेंन्मेंट झोन बनविण्यावर, टे्रसिंगवर, तसेच लसीकरणावर भर द्यावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. याआधीही याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र राज्ये अजूनही कंटेंन्मेंट झोन बनविण्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

leave a reply