कोरोना, युक्रेनचे युद्ध व आक्रमक वित्तीय धोरणांमुळे महागाईचे जागतिकीकरण होत आहे

- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास

महागाईचे जागतिकीकरणहैद्राबाद- कोरोनाची साथ ओसरल्यानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असतानाच युरोपमध्ये युद्ध सुरू झाले. यामुळे महागाई झाली. अशा परिस्थितीत पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने महागाईचे जागतिकीकरण झाले आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. कोरोनाची साथ, युक्रेनचे युद्ध आणि त्यानंतर देशांनी आपल्या वित्तीय धोरणात केलेले आक्रमक बदल, असे तीन धक्के आपल्याला बसले आहेत. या धक्क्यांमुळे आर्थिक व्यवस्था विस्कळीत झाली आणि आर्थिक व वित्तीय धोरण आखण्यासाठी आवश्यक असलेले माहितीचे स्त्रोत यामुळे बाधित झाले आहेत, ही अत्यंत महत्त्वाची बाब रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरांनी लक्षात आणून दिली.

रिझर्व्ह बँकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च’च्या वार्षिक कार्यक्रमात गर्व्हनर शक्तिकांत दास बोलत होते. कोरोनाची तिसरी साथ आलेली असताना देखील भारतीय अर्थव्यवस्था या धक्क्यातून सावरून रूळावर येत होती. अशा काळात युरोपमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धाचे परिणाम साऱ्या जगाला सहन करावे लागले व यामुळे अन्नधान्य तसेच इंधनाची टंचाई निर्माण झाली. युक्रेनच्या युद्धामुळे पुरवठा साखळी बाधित झाली आणि यामुळे महागाई भडकली. पुरवठा साखळीच्या या समस्येमुळे महागाईचे जागतिकीकरण झाले, अशा शब्दात शक्तिकांता दास यांनी देशासमोर खड्या ठाकलेल्या आर्थिक समस्येची माहिती दिली.

२०२० सालच्या मार्च महिन्यापासून ते आत्तापर्यंत कोरोनाची साथ, युक्रेनचे युद्ध आणि देशांनी स्वीकारलेले आक्रमक वित्तीय धोरण, असे तीन धक्के भारताला बसले आहेत. थेट उल्लेख केलेला नसला तरी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेली व्याजदरातील वाढ केवळ भारतच नाही तर जगभरातील सर्वच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी चिंताजनक बाब ठरली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय चलन असलेल्या अमेरिकेच्या डॉलरचे दर वाढले व त्या तुलनेत इतर देशांच्या चलनात घसरण झाली. याचा परिणाम भारतावरही झाला. याचा दाखला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देत असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे या तिन्ही धक्क्यांनंतर परिस्थिती अजूनही स्थिरावलेली नाही, यामुळे आर्थिक व वित्तीय धोरण आखताना फार मोठ्या समस्या समोर येत असल्याची बाब दास यांनी लक्षात आणून दिली.

आर्थिक व वित्तीय धोरण आखताना, कुठल्या आवश्यक वस्तूंच्या किंमती स्थीर राखायच्या, कुणाला करातून सवलत द्यायची व कुठल्या आवश्यक गोष्टींवर अनुदान द्यायचे, याचा विचार करावा लागतो. यासाठी सखोल पाहणी व सर्वेक्षण केले जाते. पण अर्थव्यवस्थेला बसलेल्या तीन धक्क्यांचे सारे परिणाम अजूनही समोर आलेले नाहीत, त्यामुळे आर्थिक व वित्तीय धोरण आखणे अतिशय अवघड बनले आहे, असा दावा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी केला. मात्र रिझर्व्ह बँक अर्थव्यवस्थेशी निगडीत या साऱ्या गोष्टींवर बारकाईने नजर ठेवून असल्याची माहितीही यावेळी शक्तिकांत दास यांनी दिली.

आत्ताच्या काळातील भूराजकीय घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्था वेगवेगळ्या भागात खंडीत झालेली आहे. अशा स्थितीत कुठल्याही प्रकारच्या पुरवठ्यासाठी केवळ एकाच स्त्रोतावर अवलंबून राहणे घातक ठरू शकते, याचीही जाणीव रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी करून दिली.

leave a reply