भारताने कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत दीडशे कोटी लसींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – भारतात कोरोना लसीकरण मोहीम सुरू होऊन एकवर्ष पुर्ण होत असताना दीडशे कोटी लस देण्याचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला गेला आहे. यामध्ये 62 कोटी जणांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर सुमारे 87 कोटी जणांनी लसीचा एकतरी डोस घेतलेला आहे. पाच दिवसातच 15 ते 18 वर्ष वयोगटातील सुमारे दोन कोटी मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणाचा हा ऐतिहासिक टप्पा ओलांडल्यावर पंतप्रधानांनी देशवासीयांचे अभिनंदन केले आहे.

भारताने कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत दीडशे कोटी लसींचा टप्पा ओलांडलाशुक्रवारी देशातील कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत दीडशे कोटी लस देण्याचा टप्पा ओलांडला गेला. देशात लसीकरण सुरू झाल्यापासून शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 150 कोटी 55 लाख नागरिकांना लसीचे डोस मिळाले आहेत. तर एका दिवसात 85 लाखांहून अधिक जणांना लस मिळाली आहे. गुरुवारीही 95 लाख जणांनी लस घेतली होती. तर बुधवारी एक कोटीहून अधिक लसीकरण झाले होते. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरूवात झाली होती. त्यानंतर लसीकरणाने आणखी वेग पकडला आहे.

ऑक्टोबर महिन्यात देशाने 100 कोटी लस देण्याचा महत्त्चाचा टप्पा ओलांडला होता. गेल्यावर्षी 16 जानेवारीपासून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींद्वारे देशात लसीकरण मोहिमेला आरंभ झाला होता. ही लसीकरण मोहिम सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होण्यास नऊ दिवस शिल्लक असताना दिडशे कोटी लसींचे डोस देण्याचा महत्त्वाचा टप्पाही ओलांडला गेला आहे. लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात देशात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कसचे लसीकरण सुरू झाले होते. दुसऱ्या टप्प्यात जेष्ठ नागरिकांचे आणि तीसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होती घेण्यात आले. मे महिन्यापासून 18 ते 44 वर्षामधील नागरिकांच्याही लसीकरणाला सुरूवात करण्यात आली.

सध्या देशात एक कोटी तीन लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर 97 लाख 32 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसींचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तसेच एक कोटी 83 लाख फ्रन्टलाईन वर्कर्सना लसीचा पहिला डोस आणि एक कोटी 69 लाख 41 जणांना लसींचे दोन डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वयोगटातील 50 कोटी 95 लाख जणांनी पहिला व 34 कोटी 57 लाख जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

तसेच 45 ते 59 वयोगटातील 19 कोटी 56 लाख जणांना पहिला डोस देण्यात आला असून 15 कोटी 43 लाख जणांना लसीचे दोन मिळाले आहेत. तर 60 वर्षांवरील नागरीकांचे पहिली लस घेतलेल्या व लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांचे प्रमाण अनुक्रमे 12 कोटी 19 लाख 97 हजार आणि 9 कोटी 71 लाख 68 हजार इतके आहे. 10 जानेवारीपासून 60 वर्षांवरील एकापेक्षा जास्त व्याधीने ग्रस्त नागरिकांना बुस्टर डोस अर्थात प्रीकॉर्शनरी डोस देण्यास सुरुवात होईल.

भारताच्या कोरोना लसीकरण मोहिमेची ही आकडेवारी खूप मोठी आहे. जगातील बड्या देशांसाठी हे आश्‍चर्यापेक्षा कमी नाही. तसेच हे भारताच्या 130 कोटी नागरिकांच्या क्षमतेचेही प्रतिक आहे. त्यांचा आत्मविश्‍वास आणि आत्मनिर्भरता यातून दिसून येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

leave a reply