खाजगी रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी जास्त किंमत मोजावी लागणार

नवी दिल्ली – सध्या खाजगी रुग्णालयांना केंद्र सरकारकडून कोरोना लसींचे डोस पुरविले जात आहेत. खाजगी रुग्णालयात जाऊन ही लस घेण्यासाठी २५० रुपये आकारले जातात. मात्र १ मे पासून ही व्यवस्था संपुष्टात येईल. आता केंद्र सरकार खाजगी रुग्णालयांना लस पुरविणार नसून त्यांना ही लस थेट लस उत्पादकांकडून खरेदी करावी लागेल. यामुळे खाजगी रुग्णालयात लस घेण्यासाठी अधिक पैसे चुकते करावे लागू शकतात. कारण लस उत्पादकांकडून मिळणार्‍या किंमतीवर खाजगी रुग्णालये वाढीव आकार लावून ही लस देतील. म्हणून खाजगी रुग्णालयात लस घेण्यासाठी सुमारे हजार रुपये लागू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र सरकारी लसीकरण केंद्रांवर सरकारच्या कार्यक्रमाअंतर्गत पात्र नागरिकांचे मोफत लसीकरण सुरूच राहणार आहे.

तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी राज्यांना आणि खाजगी रुग्णालये व कंपन्यांना थेट उत्पादकांकडून लस देण्याची मूभा दिली होती. या नव्या धोरणाअंतर्गत उत्पादक आपण उत्पादन घेत असलेल्या ५० टक्के लसी पूर्वी निश्‍चित केलेल्या किंमतीत या केंद्र सरकारला देणार आहेत, तर ५० टक्के लसी या राज्य सरकारला व खुल्या बाजारात उत्पादक विकू शकतील. हे नवे धोरण १ मे पासून अस्तित्वात येत आहे. यामुळे सध्या खाजगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांना लसीचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत आहे, ती व्यवस्था आता बंद होणार आहे.

केंद्र सरकारला कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लस उत्पादकांकडून दीडशे ते दोनशे रुपयांना लस मिळत असून ही लस लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत मोफत दिली जात आहे. तर खाजगी रुग्णालयांमध्ये यासाठी प्रत्येक डोसमागे २५० रुपये आकारले जातात. मात्र आता खाजगी रुग्णालये उत्पादकांकडून लस घेतील. यामुळे त्या दोघांमध्ये निश्‍चित झालेल्या किंमतीच्या आधारावर तेथील लस घेण्यासाठी किंती रुपये द्यावे लागतील, हे ठरणार आहे. मात्र ही किंमत किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोविशिल्डचे उत्पादन घेणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूटने बुधवारी राज्य सरकारला ४०० रुपये प्रति डोस, तर खाजगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रति डोस इतक्या दराने लस पुरवठा करू असे जाहीर केले आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक अदार पुनावाला यांनी ही घोषणा करताना कंपन्यांना लस पुरविणे शक्य नसू त्यांनी खाजगी रुग्णालयांकडून ही लस खरेदी करावी, असे म्हटले आहे.

यावरून आता कोविशिल्ड खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयात मिळेल, असे स्पष्ट होत आहे. यावर खाजगी रुग्णालये आपले शुल्क आकारतील. त्यामुळे ही लस खाजगी रुग्णालयात सुमारे हजार रुपयांना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खाजगी रुग्णालये आकारल्या जाणार्‍या लसीच्या किंमतीवर केंद्र सरकार लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले जाते.

पण केंेद्र सरकारद्वारे राबविलेल्या जाणार्‍या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत सरकारच्या लसीकरण केंद्रांवर लस मोफत मिळणार आहे. तसेच बहुतांश राज्यांनीही लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे दुसर्‍या बाजूला सरकारी लसीकरण कार्यक्रम मोफत सुरू राहणार आहे.

leave a reply