२०२१ च्या पहिल्या तिमाहीत कोरोनावर लसीची शक्यता 

- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन    

नवी दिल्ली – देशात आणि जगात इतरत्र कोरोनावरील निरनिराळ्या लसींच्या चाचण्या सुरु असून कोणती लस जास्त प्रभावशाली आणि सुरक्षित ठरेल, हे आताच सांगता येणार नाही. मात्र २०२१ पहिल्या तीन महिन्यात निरनिरळ्या लसींच्या चाचण्यांचे निकाल समोर येतील, असा अंदाज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला. भारतात कोरोनावरील लसींच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोणतीही काटछाटकरण्यात येणार नाही. लस सुरक्षित असल्याचे निश्चित झाल्यावरच ती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन हर्ष वर्धन यांनी दिले. लस पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, जेष्ठ नागरिक, कमकुवत इम्युनिटी आणि इतर गंभीर आजार असलेल्या नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल, असेही हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.
कोरोनावर लस
देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४८ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. तसेच या साथीने दगवणाऱ्यांची संख्या ७९ हजारांवर गेली आहे. शनिवारी देशात सलग तिसऱ्या दिवशी ९७ हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले. रविवारी रात्रीपर्यंत तितक्याच नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे राज्यांकडून प्रसिद्ध माहितीवरून स्पष्ट होते. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही, असे आवाहन जनतेला केले आहे.
रविवारी महाराष्ट्रात ४१६ जणांचा बळी गेला आणि २२,५४३ नव्या  रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत महाराष्‍ट्रात दहा लाख ६० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.  तसेच २९,५३१ जण या साथीने दगावले आहेत. राज्यातील कोणाचा मृत्यू दर २.८१ टक्के आहे.  येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती अधिकच गंभीर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जाते. यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क घालण्याची शिस्त नागरिकांनी पाळावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.
कोरोनावर लसमहाराष्ट्रानंतर आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात स्थिती गंभीर आहे. आंध्रप्रदेशामध्ये एका दिवसात ६६ जणांचा बळी गेला असून ९५३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कर्नाटकात एका दिवसात १०४ जणांचा मृत्यू झाला, तर ९८९४ नव्या रुग्णांची नोंद झाली.  तमिळनाडूत चोवीस तासात ७४ जण दगावले आणि ५६९३ नवे रुग्ण आढळले.
उत्तरप्रदेशात एका दिवसात ८० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६२२९  नव्या रुग्णांची नोंदणी झाली. दिल्लीमध्ये ४३३५ नवे रुग्ण सापडले पश्चिम बंगालमध्ये ५८ जणांचा मृत्यू झाला आणि ३२५० नव्या रुग्णांची नोंद झाली. गुजरात मध्ये कोरोनाने पंधरा जण दगावले आणि १३२६ नव्या रुग्णांची नोंद झाली.
दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. ११ मे ते ४ जून दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात कोरोना होऊन गेलेल्या पण निदान न झालेल्या रुग्णांचे प्रमाण खूपच जास्त होते. एका निदान झालेल्या रुग्णामागे ८२ ते १३० जणांचे निदान होत नव्हते. या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार मे महिन्यात साथीचा सुरुवातीचा टप्पा असताना देशात ६५ लाख जणांना कोरोना झाला होता. मात्र यातील बहुतांश जणांचे  निदानच झाले नव्हते, असा ‘आयसीएमआर’चा अहवाल सांगतो. सध्या देशात दरदिवशी घेण्यात येत असलेल्या चाचण्यांची संख्या मे महिन्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे जास्तीत जास्त रुग्णांची नोंद होत आहे.

leave a reply