देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सव्वा दोन लाखांवर

नवी दिल्ली – देशात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे. बुधवारपासून गुरुवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात २६० जणांचा बळी गेला, तर ९,३०४ नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातील या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली असून, एकूण रुग्णांची संख्या दोन लाख १७ हजारांजवळ पोहोचली आहे. मात्र गुरुवारी रात्री विविध राज्यांकडून जाहीर करण्यात आलेली माहिती पाहता देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या सव्वा दोन लाखांवर पोहोचल्याचे स्पष्ट होते. गुरुवारी महाराष्ट्रात एका दिवसात १२३ जणांचा बळी गेला आणि २९३३ नवे रुग्ण आढळले. बुधवारीही राज्यात १२२ जण या साथीने दगावले होते.

India, Coronavirus

‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार देशात चोवीस तासात कोरोनाच्या एक लाख ३९ हजार चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत देशात ४२ लाख ४३ हजार चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे. देशात जानेवारी महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या एक लाख होण्यास ११० दिवस लागले होते. १८ मे रोजी देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या लाखावर पोहोचली होती. एका लाखाहून दोन लाख रुग्ण संख्या होण्यास केवळ १५ दिवसाचा अवधी लागला. २ जून रोजी सकाळी आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले होते. त्यानंतर केवळ तीन दिवसात रुग्णांची संख्या सुमारे २५ हजाराने वाढली आहे.

गेल्या आठवडाभरापासून देशात दर दिवशी आठ हजार रुग्ण आढळून येत होते. आता चोवीस तासात नऊ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. तसेच कोरोनाचे रुग्ण दगावण्याची संख्याही वाढत आहे. गुरुवारी महाराष्ट्रातच १२३ जणांचा बळी गेला. यातील ४८ बळी मुंबईत गेले आहेत. राज्यात गुरुवारी २९३३ नवे रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईतील १४४२ नव्या रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या १,४६५ वर पोहोचली असून एकूण रुग्णांची संख्या ४४,७०४ वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत ७७,७९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्रात या साथीच्या काळात अखंड सेवा बजाविणारे वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याचा नोंदी दरदिवशी होत आहेत. राज्यात आतापर्यंत ३० पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर एकूण २,५५७ पोलिसांना या साथीची लागण झाली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत ५०० डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान मुंबईनंतर सर्वाधिक वेगाने दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. गुरुवारी दिल्ली १३५९ नवे रुग्ण आढळले, तर बुधवारी ५० जणांचा बळी गेला होता आणि १५०० हून अधिक रुग्ण आढळले होते. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २५ हजारांचा पुढे गेली आहे. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीत आतापर्यंत या साथीने ६०६ जण दगावले आहेत. तमिळनाडूमध्ये चोवीस तासात १२ जण दगावले असून १३७३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या राज्यातील रुग्णांची संख्या २७ हजारांच्या पुढे पोहोचली आहे.

leave a reply