देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या चार दिवसात ८०० ने वाढली

नवी दिल्ली, दि. १ (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या ४० झाली असून  रुग्णांची  संख्या चार दिवसात सुमारे ८०० ने वाढून १८०० च्या पुढे गेली आहे. अचानक तीन  दिवसात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढण्यामागे दिल्लीत काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजकांनी दाखवलेला  बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने केला आहे. एकट्या तामिळनाडूत ११० नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली असून हे सारे जण या  कार्यक्रमात सहभागी होऊन परतले  होते, अशी माहिती पुढे येत आहे.

बुधवारी  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी  मंगळवारपासून देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ३८६ ने वाढून १,६३७ झाल्याची माहिती दिली. याआधी मंगळवारी माहिती देताना सोमवारी २२७ नवे रुग्ण आढळल्याचे आणि रुग्णांची संख्या १,३४७ वर गेल्याचे सांगितले होते, तर त्याआधी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना रविवारच्या दिवसात ९९ नवे रुग्ण आढळल्याचे आणि एकूण रुग्णांची संख्या १,०७१ वर पोहोचल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली होती. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिवांनी दिलेल्या या माहितीनुसार रविवार, सोमवार व मंगळवार या तीन दिवसात ५६६ नवे रुग्ण देशभरात आढळले. बुधवारी रात्रीपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या वाढून १८०० च्या पुढे गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रविवार ते बुधवार या चार दिवसाच्या कालावधीत रुग्णांची संख्या सुमारे ८०० ने वाढली आहे. 

कोरोनाच्या रुग्णांमध्ये देशात अचानक वाढ झाल्याबद्दल अग्रवाल यांनी दिल्लीत आयोजित धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजकांच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवले. या कार्यक्रमात या विषाणूचा संसर्ग झालेल्या  अनेक जणांनी देशातील विविध भागात प्रवास केल्याने रुग्ण संख्येत ही वाढ झाल्याचे अग्रवाल म्हणाले. तसेच या कार्यक्रमाच्या ठिकाणी सोमवारपर्यंत वास्तव्य करून असलेल्या १८०० जणांना बाहेर काढून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 

            दरम्यान तामिळनाडूत ११० नवे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व तबलिघी  जमातच्या 
 धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे या राज्यातील रुग्णांची संख्या वाढून २३४ झाली आहे. आंध्रप्रदेशात ४३ नवे रुग्ण आढळले असून यातील बहुतांश जण याच कार्क्रमात सहभागी झाले होते, असे सांगितले जाते. बुधवारी मध्यप्रदेशात २०, महाराष्ट्रात १९, राजस्थानात १३, गुजरातमध्ये ८, आसाममध्ये ८ आणि कर्नाटकात ४  नवे रुग्ण आढळले आहेत. आसाममध्ये आढळलेले आठही जण दिल्लीतील कार्यक्रमातून परतले होते. 

leave a reply