कोरोनाव्हायरस’मुळे जग भयंकर आर्थिक संकटाच्या गर्तेत – आयएमएफ’ प्रमुख

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसमुळे जगासमोर २००८ सालच्या आर्थिक मंदीपेक्षाही भयंकर आर्थिक मंदीचे संकट खडे ठाकले आहे. यातून सावरण्यासाठी कमीत कमी अडीच लाख कोटी डॉलर्सची आवश्यकता आहे. त्याची तरतूद झाली तरच २०२१ सालापर्यंत जग या संकटातून निदान काही प्रमाणात बाहेर पडेल असा इशारा आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख क्रिस्टलीना जॉर्जीवा यांनी दिला आहे.

‘कोरोनाव्हायरस’चे संकट जगाला मंदीच्या आपत्तीत घेऊन आले आहे. या साथीने जागतिक अर्थव्यवस्थेला मागे ढकलले आहे. आर्थिक उलाढाली ठप्प झाल्या आहेत. पुढच्या काळात याचे अधिक भयंकर परिणाम समोर येऊ शकतात त्याचीही जाणीव ‘आयएमएफ’ प्रमुख जॉर्जीवा यांनी करून दिली.

या संकटामुळे कंपन्या दिवाळखोर होण्याची शक्यता आहे. यामुळे नोकऱ्यांचीही छाटनी सुरु होण्याचा धोका आहे. सामाजिक रचना विखुरण्याची भीती आहे. या स्थितीतून वाचण्यासाठीच कित्येक देशांनी आरोग्य सेवा सुधारण्याच्या आणि अर्थव्यवस्था संभाळण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत, असे ‘आयएमएफ’ प्रमुख यांनी अधोरेखित केले.

२०२१ सालात जग या मंदीतून थोडेफार सावरण्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. मात्र ‘कोरोनाव्हायरस’चे हे संकट नियंत्रणात आले तरच हे शक्य आहे, असे जॉर्जीवा म्हणाल्या. तसेच जागतिक अर्थव्यवस्था काहीप्रमाणात सावरण्यासाठी कमीत कमी अडीच लाख कोटी डॉलरची आवश्यकता आहे. जगातील ८० देशांनी निधीची मागणी केली आहे याकडे जॉर्जीवा यांनी लक्ष वेधले.

कोरोनाव्हायरसची साथ आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन लाख कोटी डॉलर्स हून अधिक रकमेच्या पॅकेजची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांनी स्वागत केले अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अशाच उपायांची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाव्हायरस साथीमुळे जगातील प्रमुख देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जनतेचे घराबाहेर पडणे शक्य नसल्यामुळे अर्थव्यवहार ठप्प झाला आहे. यामुळे कित्येक जणांचा रोजगार धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जीवा यांनी दिलेला हा आर्थिक संकटाचा इशारा साऱ्या जगाला गंभीर परिणामांची जाणीव करून देत आहे.

leave a reply