चीन व पाकिस्तानबरोबरील ‘ग्रे झोन वॉरफेअर’साठी देशाने क्षमता विकसित करावी

- लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

नवी दिल्ली – भारत आणि चीनमधील सीमावाद ही गुंतागुंतीची समस्या आहे खरी. पण यावर दोन्ही देशांना युद्ध किंवा संघर्ष करण्याची इच्छा नाही, असा दावा भारतातील चीनच्या राजनैतिक अधिकारी मा जिया यांनी केला आहे. त्यांचा हा दावा प्रसिद्ध होत असतानाच, भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी देशाने ‘ग्रे झोन वॉरफेअर’ अर्थात थेट नाही, अप्रत्यक्ष युद्धासाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला. चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांबरोबरील न सुटलेल्या सीमावादाचा दाखला देऊन या क्षणी देखील हे देश भारताविरोधात ‘ग्रे झोन वॉरफेअर’च्या हालचाली करीत असतील, असे लष्करप्रमुखांनी बजावले आहे.

चीन व पाकिस्तानबरोबरील ‘ग्रे झोन वॉरफेअर’साठी देशाने क्षमता विकसित करावी - लष्करप्रमुख जनरल मनोज पांडेआत्ताच्या काळात थेट युद्धाची जोखीम न पत्करता शत्रूदेशाला आपल्या छुप्या कारवाया व कारस्थांनी जेरीस आणणे, शत्रूदेशात अस्थैर्य तसेच बेदिली माजविणे आणि त्या देशाचा आत्मविश्वास नष्ट करण्याबरोबरच शांतपणे आपले हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या तंत्राचा ‘ग्रे झोन वॉरफेअर’मध्ये समावेश केला जातो. यामध्ये थेट युद्ध न करता देखील युद्धाचे परिणाम साधण्यात यश मिळते व त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत नाही. चीन अशाप्रकारच्या युद्धतंत्रात पारंगत असल्याचे दावे केले जातात. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याबरोबर झालेल्या संघर्षाच्या आधी चीनच्या लष्कराने एलएसीवर सातत्याने घुसखोरी करून नंतर माघार घेण्याचे सत्र सुरू ठेवले होते. अशारितीने पुढे सरकत सरकत एलएसीवरील भारताच्या ताब्यातील भूमीवर आपला दावा भक्कम करण्याचा डाव यामागे होता. याला सलामी स्लायसिंग असे म्हटले जात होते व हा चीनच्या ‘ग्रे झोन’ युद्धतंत्राचाच भाग होता.

थेटपणे चीन तसेच पाकिस्तानचा थेट नामोल्लेख न करता लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी या नव्या युद्धतंत्राच्या आघाडीवर देशाने सज्जता ठेवावी, असा संदेश दिला. किंबहुना आपल्या विरोधात अशा स्वरुपाच्या युद्धतंत्राचा वापर करण्याची संधी इतरांना मिळणार नाही, इतकी क्षमता भारताने विकसित करावी, असे लष्करप्रमुखांनी म्हटले आहे. आपल्या शत्रूला अशी कारस्थाने आखण्याची उसंतच मिळता कामा नये, असे सांगून या आघाडीवर भारताने डावपेच आखावे, असे याद्वारे लष्करप्रमुखांनी सुचविले आहे.

‘पीएचडीसीसीआय डीईएफ एक्स टेक इंडिया 2023’ या नवी दिल्लीत पार पडलेल्या परिषदेत लष्करप्रमुख बोलत होते. आपण या ठिकाणी बोलत असतानाच देशाविरोधात ‘ग्रे झोन वॉरफेअर’च्या कारवाया सुरू असतील, असे सांगून जनरल पांडे यांनी यापासून देशाला सावध केले.

दरम्यान, आत्ताच्या काळातील युद्ध अतिशय गतीमान व अल्पावधीची असतील, हा समज युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाने दूर केला, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. युक्रेनच्या युद्धामुळे लष्कराची पारंपरिक युद्धविषयक क्षमता कायम ठेवण्याची आवश्यकता नव्याने प्रस्थापित झाली आहे. अचूकतेने मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमुळे अंतराला फारसे महत्त्व राहिलेले नाही. कारण अत्याधुनिक क्षेपणास्त्रे दूरवरून आपले लक्ष्य नष्ट करू शकतात. त्याचवेळी हवाई हल्ले चढविण्यासाठी आता वैमानिक असलेल्या लढाऊ विमानांची आवश्यकता राहिलेली नाही, शस्त्रसज्ज ड्रोन्स हे काम करू शकतात, हे युक्रेनच्या युद्धाने दाखवून दिल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लक्षात आणून दिले. तसेच रशियाची युद्धनौका मॉस्कोवा अवघ्या दोन युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांच्या माऱ्याने बुडाली होती, याचीही आठवण लष्करप्रमुखांनी करून दिली.

भूभाग हाच आत्ताच्या काळातील युद्धातही सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो आणि जिंकलेला भूभाग हाच विजयाचा निकष मानला जातो, हे देखील युक्रेनच्या युद्धामुळे सिद्ध झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून अद्ययावतीकरण करावे लागेल, असे लष्करप्रमुख पुढे म्हणाले. भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाबाबत देखील लष्करप्रमुख पांडे यांनी महत्त्वाची माहिती दिली. ‘लष्कराने आपल्यासाठी सुमारे 47 अतिप्रगत तंत्रज्ञानांची नोंद केली असून आधीच्या व या नव्या तंत्रज्ञानामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न लष्कर करीत आहे. भारतीय लष्कराकडील युद्धसाहित्यामध्ये 47 टक्के पारंपरिक तर 41 टक्के आत्ताच्या काळातील व 12 टक्के प्रगत युद्धसाहित्य असल्याची माहिती जनरल पांडे यांनी दिली. 2030 सालापर्यंत यात बदल होऊन 20 टक्के पारंपरिक, 35 त्या काळातील व 40 ते 45 टक्के प्रगत तंत्रज्ञानाने युक्त युद्धसाहित्य असेल, असा विश्वास लष्करप्रमुखांनी व्यक्त केला.

या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत भारताच्या खाजगी उद्योगक्षेत्राचे खूप मोठे योगदान असेल, असेही जनरल मनोज पांडे यांनी म्हटले आहे.

हिंदी

 

leave a reply