कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कृषी क्षेत्रावर परिणाम नाही – नीति आयोगाचा दावा

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कृषी क्षेत्र व त्याच्याशी निगडीत कोणत्याही क्षेत्रावर परिणाम दिसून येणार नाही, असे नीति आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे कृषी क्षेत्राचा विकासदर यावर्षीही तीन टक्क्यांपेक्षा अधिक राहिल असा विश्‍वास नीति आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केला आहे. गेल्यावर्षीही भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर उणे सात टक्के राहिला असतानाही कृषी क्षेत्रात 3.6 टक्क्यांची वाढ झाली होती. यावेळेलाही तसेच चित्र दिसेल. यामुळे ग्रामीण भागात उत्पन्नावर व तेथील मागणीवर फारसा परिणाम जाणवणार नाही, असा दावा चंद यांनी केला आहे.

कृषी क्षेत्रभारत सरकारचे सध्या कृषी क्षेत्राशी निगडीत सबसिडी, मूल्य व तंत्रज्ञानाबाबतचे धोरण तांदूळ, गहू, साखर यासारख्या पिकांना पुरक आहे. आता डाळींच्या बाबतीतही असेच प्रोत्साहीत करणारे धोरण बनविण्यावर भर दिला जात आहे. डाळींच्या बाबतीत खरेदी व आधारभूत मूल्यांच्या धोरणात आणखी सुधारणा होणे आवश्यक असल्याचे नीति आयोगाचे (कृषी) सदस्य रमेश चंद यांनी स्पष्ट केले. तसेच दुसर्‍या लाटेचा यावर्षी कृषी क्षेत्रावर प्रभाव दिसून येईल, याबाबतच्या चिंता त्यांनी फेटाळून लावल्या.

भारतात कोरोनाची दुसरी लाट गावांपर्यंत साधारण मे महिन्यात पोहोचली. मे महिन्यात भारतात ग्रामीण क्षेत्रात शेतीची कामे फारशी होत नाहीत. मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये शेतीची कामे अधिक प्रमाणात असतात. मे महिन्यात कोणतेही पीक पेरणीची किंवा मशागतीची कामे होत नाहीत. काही प्रमाणात भाज्यांची व काही मोसमी पीके घेतली जातात, ही बाब दुसर्‍या लाटेचा कृषी क्षेत्रावर परिणाम होणार नसल्याचा तर्क देताना अधोरेखित केली. त्यामुळे मे ते जूनमध्यापर्यंत कोरोनामुळे मजूरांची कमतरता भासली, तरी त्याचा मोठा परिणाम होणार नसल्याचा दावा रमेश चंद यांनी केला.

तसेच शहरी भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर येथून मजूरांनी पुन्हा ग्रामीण भागात स्थलांतरण केले. सध्या हे मजून कृषी क्षेत्रात काम करण्यावर भर देतील आणि त्यातून आपली उपजिवीका मिळवितील. कृषी उत्पादन पाहील्यावरही कृषी क्षेत्रावर कोरोनाच्या लाटेचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येईल, असे चंद म्हणाले.

तसेच ग्रामीण भागता बहुतांश नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत हे शेती असून यामुळे ग्रामीण भागतील उत्पन्नावर कोरोनाच्या लाटेचा परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मागणीवरही कोरोनाच्या लाटेचा प्रभाव जाणावणार नाही, असे चंद यांनी लक्षात आणून दिले.

leave a reply