तेहरिकबरोबरच्या नव्या संघर्षबंदीवर पाकिस्तानात टीका

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या लष्कराने तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेबरोबर 30 मेपर्यंत संघर्षबंदीची घोषणा केली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमीद व आयएसआय’शी संबंधित हक्कानी नेटवर्कने या संघर्षबंदीसाठी पुढाकार घेतल्याचा दावा केला जातो. संघर्षबंदी जाहीर होऊन काही तास उलटत नाही तोच पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात लष्कराचा जवान ठार झाला. त्यामुळे तेहरिकबरोबर संघर्षबंदी करून लष्कर सर्वात मोठी चूक करीत असल्याची टीका पाकिस्तानातून होत आहे. तसेच 30 मे नंतर काय होणार, असा प्रश्न पाकिस्तानची माध्यमे विचारत आहेत.

Criticism-in-Pakistan-Tehrikपाकिस्तानच्या पेशावर कॉर्प्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमिद यांनी दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचा दौरा केला. तालिबानच्या हक्कानी नेटवर्कने तेहरिक-ए-तालिबानच्या नेत्यांबरोबर आयोजित केलेल्या चर्चेमध्ये फैझ हमिद सहभागी झाले होते. पाकिस्तानच्या पश्चिम सीमाभागात मोठ्या प्रमाणात हल्ले चढविणाऱ्या तेहरिकच्या दहशतवाद्यांनी संघर्षबंदी जाहीर करावी, अशी मागणी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या माजी प्रमुखांनी केली.

त्यानुसार तेहरिकने 30 मेपर्यंत संघर्षबंदीची घोषणा केली. पण त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्करासमोर आपल्या मागण्या ठेवल्या. यामध्ये पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची सुटका, तसेच अफगाणिस्तानातून पाकिस्तानात परतलेल्या तेहरिकच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या सरकारने आर्थिक सहाय्य, कुटुंबांना माफी देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्याचबरोबर वझिरिस्तान प्रांतातील घरांवरील धाडी बंद कराव्या, अशी मागण्यांची यादी तेहरिकने पाकिस्तानी लष्करासमोर ठेवली.

पाकिस्तानी लष्कराने देखील तेहरिककडे सीमेवरील हल्ले बंद करण्याची आणि कुंपण उभारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तेहरिकच्या नेत्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या मागण्या मान्य केल्या का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी तेहरिकच्या 30 खतरनाक दहशतवाद्यांची सुटका केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. यामध्ये फाशी किंवा आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो.

लेफ्टनंट जनरल फैझ हमिद यांच्या नेतृत्वाखाली आणि हक्कानी नेटवर्कच्या मध्यस्थीने झालेल्या या वाटाघाटींवर पाकिस्तानातून टीका होत आहे. याआधीही पाकिस्तानी लष्कर आणि तेहरिकमध्ये संघर्षबंदी झाली होती. पण महिन्याभरानंतर तेहरिकने पाकिस्तानी लष्करावर भीषण हल्ले चढविले होते. तसेच ड्युंरड लाईनवर तैनात पाकिस्तानी जवानांना धमकावून तारेचे कुंपण उखडून टाकण्याचे प्रकार घडले होते. याची आठवण पाकिस्तानी माध्यमे करून देत आहेत.

येत्या वर्षअखेरीस पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांची निवड होणार आहे. या पदावरील आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी फैझ हमिद यांनी हक्कानी नेटवर्कच्या सहाय्याने ही तात्पुरती संघर्षबंदी घडविली असली तरी यामुळे सीमेवरील तालिबानचे हल्ले थांबणार नसल्याची जाणीव पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार करुन देत आहेत.

leave a reply