चीनला केलेल्या कॉलवरून अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मिले यांच्यावर टीकेची झोड

अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुखवॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी चीनच्या लष्करी अधिकार्‍यांना केलेल्या फोन कॉल्सवरून त्यांच्यावर जबरदस्त टीकेची झोड उठली आहे. माजी लष्करी अधिकार्‍यांनी जनरल मिले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर टॉम कॉटन यांनी, संरक्षणदलप्रमुखांची संसदेसमोर सुनावणी व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. तर संसद सदस्य रॉनी जॅक्सन यांनी जनरल मिले यांना तुरुंगात धाडावे, अशा शब्दात टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकी विश्‍लेषकांनी जनरल मिले यांचे कोर्ट मार्शल करण्याची मागणी केली आहे.

अमेरिकन पत्रकार बॉब वुडवर्ड व रॉबर्ट कोस्टा यांचे ‘पेरील’ नावाचे पुस्तक पुढील आठवड्यात प्रकाशित होत आहे. या पुस्तकात, वुडवर्ड व कोस्टा या जोडीने संरक्षणदलप्रमुख मार्क मिले यांनी चीनच्या अधिकार्‍यांना केलेल्या दोन कॉल्सची माहिती दिली आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पाडल्यानंतर जनरल मिले यांनी हे कॉल्स केल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी निकाल स्वीकारायला नकार दिल्यानंतर ते अधिक आक्रमक होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.

या पार्श्‍वभूमीवर जनरल मिले यांनी चीनचे वरिष्ठ अधिकारी ली झुओचेंग यांना दोन फोन कॉल्स केले होते. त्यात, अमेरिका स्थिर आहे व हल्ला करणार नाही, असे मिले म्हणाले होते. त्याचवेळी जर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हल्ल्याचे आदेश दिले, तर त्यापूर्वी चीनला हल्ल्याबाबत सावधगिरीचा इशारा दिला जाईल, असेही अमेरिकेच्या संरक्षणदलप्रमुखांनी सांगितले होते. चीन हा अमेरिकेच्या सुरक्षेला असणारा सर्वात मोठा धोका असल्याचे समोर येत असताना सर्वोच्च लष्करी अधिकार्‍यांनी चीनला हल्ल्याच्या पूर्वसूचनेचे आश्‍वासन देणे धक्कादायक मानले जाते.

जनरल मिले यांनी कॉल्स केल्याचे वृत्त मान्य केले असून तणाव कमी करण्याच्या दृष्टिने वक्तव्य केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी जनरल मिले यांचे समर्थन केले असून आपला त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास असल्याचे म्हंटले आहे. मात्र माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह माजी संरक्षणमंत्री, लष्करी अधिकारी, संसद सदस्य तसेच विश्‍लेषकांनी मिले यांना चांगलेच धारेवर धरले आहे. ट्रम्प यांनी जनरल मिले यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला आहे. तसेच मिले यांना अफगाणिस्तानसंदर्भातील ‘सिक्रेट्स’ माहिती असल्याने बायडेन त्यांना काढणार नाहीत, असा दावाही केला आहे.

ट्रम्प यांच्या काळात संरक्षणमंत्री असणार्‍या ख्रिस मिलर यांनी जनरल मिले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच आपण अशा प्रकारच्या कॉल्ससंदर्भात निर्देश दिले नसल्याचा खुलासा केला आहे. माजी लष्करी अधिकार्‍यांनी जनरल मिले यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेतील सिनेटर रँड पॉल तसेच विश्‍लेषक डॅन बॉंगिनो यांनी संरक्षणदलप्रमुख मिले यांच्या ‘कोर्ट मार्शल’ची मागणी केली आहे. तर, संसद सदस्य रॉनी जॅक्सन यांनी जनरल मिले यांना तुरुंगात धाडावे अशी जळजळीत प्रतिक्रिया नोंदविली आहे. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर टॉम कॉटन यांनी, संरक्षणदलप्रमुखांची संसदेसमोर सुनावणी व्हावी, अशी भूमिका व्यक्त केली आहे.

leave a reply