क्रिप्टोकरन्सी कायदेशीर चलन होऊ शकत नाही

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची शिफारस

Cryptocurrencyवॉशिंग्टन – गेल्या काही वर्षात जगभरात क्रिप्टोकरन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यासंदर्भात महत्त्वाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात क्रिप्टोकरन्सी हे कायदेशीर चलन (लीगल टेंडर) होऊ शकत नाही, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्याचवेळी क्रिप्टोकरन्सीमागे वापरण्यात येणारे ‘ब्लॉकचेन’सारखे तंत्रज्ञान जगभरातील देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये सुधारणा घडवू शकते, असेही नाणेनिधीने सुचविले आहे. विविध मध्यवर्ती बँकांकडून सुरू होणाऱ्या ‘डिजिटल करन्सीज्‌‍’ यासाठी महत्त्वाच्या ठरतील, असा उल्लेखही नाणेनिधीने आपल्या अहवालात केला.

legal currencyआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘एलिमेंटस्‌‍ ऑफ इफेक्टिव्ह पॉलिसीज्‌‍ फॉर क्रिप्टो ॲसेटस्‌‍’ या नावाचा पॉलिसी पेपर तयार केला आहे. यात नाणेनिधीच्या सदस्य देशांसाठी क्रिप्टो व्यवहारांसंदर्भात मार्गदर्शक ठरतील अशा मुद्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षात क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात झालेले मोठे घोटाळे व त्यामुळे होणारे प्रचंड नुकसान लक्षात घेता अशा घटनांना तोंड देण्यासाठी नियंत्रण असण्याची गरज आहे, असे नाणेनिधीने म्हटले आहे.

‘आर्थिक सार्वभौमत्त्व व स्थैर्य यांची सुरक्षा मोलाची असून त्यासाठी पतविषयक धोरणांची चौकट मजबूत करण्याची गरज आहे. त्याचवेळी क्रिप्टोकरन्सीला अधिकृत चलन म्हणून मान्यता दिली जाऊ नये’, अशी शिफारस आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली. याचा उल्लेख नाणेनिधीने सर्वोच्च पातळीवरची शिफारस असा केला आहे. क्रिप्टो क्षेत्रात सध्या कार्यरत असलेल्या सर्व घटकांवर योग्य लक्ष राहील अशी यंत्रणा विकसित करण्याचा सल्लाही नाणेनिधीने दिला. ‘क्रिप्टोकरन्सीचा वापर पतधोरणाची परिणामकारकता कमी करु शकतो. तसेच भांडवलाचे व्यवस्थापन करण्यासाठी असलेल्या उपायांना झुगारु शकतो. क्रिप्टोकरन्सी आर्थिक धोके मोठ्या प्रमाणात वाढवू शकते’, यावर नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाचे एकमत झाल्याची माहितीही नाणेनिधीने दिली.

गेल्या काही आठवड्यांमध्ये जगातील आघाडीचे गुंतवणूकदार तसेच अर्थतज्ज्ञांनी क्रिप्टोकरन्सीबाबत धोक्याचे इशारे दिले आहेत. क्रिप्टोकरन्सी लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असा इशारा अमेरिकी अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी दिला होता. तर जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांपैकी एक असलेले नॉरियल रुबिनी यांनी, क्रिप्टोकरन्सी म्हणजे फसव्या आर्थिक योजनांचा बुडबुडा असून लवकरच तो फुटणार आहे, असे बजावले होते. ‘एफटीएक्स’ घोटाळ्याचा संदर्भ देत सर्वांनी क्रिप्टोतील गुंतवणुकीपासून दूरच रहायला हवे, असा सावधगिरीचा सल्लाही अमेरिकी अर्थतज्ज्ञांनी दिला होता. अमेरिकेतील एका आघाडीच्या बँकेनेही क्रिप्टोतील व्यवहारांवरून ॲलर्ट जारी केला होता.

गेल्या दोन वर्षात क्रिप्टोकरन्सी क्षेत्रातील अनेक घोटाळे समोर आले असून वेगवेगळ्या प्रकारच्या ‘टोकन्स’सह (कॉईन्स) अनेक कंपन्यांनी दिवसाळखोरी जाहीर करीत गाशा गुंडाळला आहे. काही टोकन्स व कंपन्यांमधील गुंतवणूक पूर्णपणे गायब झाली असून कोट्यावधी लोकांना त्याचा फटका बसला आहे. क्रिप्टोतील गुंतवणुकीमुळे अब्जावधी डॉलर्स पूर्णपणे बुडाल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर जगातील आघाडीच्या बँकांसह अर्थतज्ज्ञ, गुंतवणूकदारांनी क्रिप्टोकरन्सीमधील धोक्यांबाबत सातत्याने लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा ‘पॉलिसी पेपर’ व त्यातील शिफारस यातील महत्त्वाचा टप्पा ठरतो.

leave a reply