महाराष्ट्राच्या 25 जिल्ह्यातील संचारबंदीचे नियम शिथिल होणार

संचारबंदीचे नियममुंबई – महाराष्ट्रात लागू असलेले लेव्हल तीन निर्बंधांतून 25 जिल्ह्यांना काहीअंशी सवलत मिळणार आहे. तर राज्यातील उर्वरीत 11 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त असल्याने येथे निर्बंध तसेच कायम राहणार आहेत. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिघ्र कृती दल आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात संचार नियमात शिथिलता आणण्यासाठी पाच स्तर ठरविण्यात आले होते. पाच टक्यांपेक्षा कमी पॉझिटिव्ह दर असलेल्या, तसेच मोठ्या प्रमाणावर रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड रिक्त असणार्‍या व ऑक्सिजनची मागणी कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आले होते. पहिल्या दोन स्तरातील जिल्ह्यांमध्ये जवळजवळ संचारनियम संपुष्टात आले होते. मात्र तिसर्‍या लाटेचा धोका व डेल्टा प्लस व्हेरियंट सापडल्यावर काही दिवसातच सर्वच जिल्ह्यांमध्ये तिसर्‍या स्तराची नियमावली लागू करण्याचा निर्णय झाला होता. तसेच रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले होते.

मात्र आता राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये 100 हून कमी रुग्ण दरदिवसाला आढळत आहेत. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये तिसर्‍या स्तरातील निर्बंधातून आणखी काही शिथिलता देण्याबाबत प्रस्ताव होता. गुरुवारी याबाबतच निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या निर्णयानुसार 25 जिल्ह्यांतील संचार नियम शिथिल होणार आहेत. तिसर्‍या स्तरातील निर्बंधानुसार सध्या 4 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवता येतात. तर शनिवार आणि रविवारी दुकाने बंद असतात. कार्यालयांमध्ये उपस्थितीबाबतही निर्बंध आहेत. पण आता 25 जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील. तर शनिवारीही चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील. रविवारी पुर्वीप्रमाणे दुकाने बंद राहणार आहेत.

चित्रपटगृह, व्यायामशाळांबाबतचे नियम काही अटीशर्थीद्वारे शिथिल करण्याचा प्रस्ताव आहे. लग्नसमारंभातील उपस्थितीबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात येणार आहे. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय येत्या तीन-एक दिवसात जाहीर केला जाईल. त्यानंतर अध्यादेेश निघेल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हा निर्णय रेल्वे खात्याशी चर्चा करून घेतला जाईल, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

दरम्यान, राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह दर हा राज्यांच्या सरासरीपेक्षा जास्त असल्याने येथे अद्याप निर्बंध शिथिल करण्याचा कोणताही विचार नाही, असेही टोपे म्हणाले. सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, बिड, रायगड, पुणे आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

leave a reply