‘निवार’ चक्रिवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुडूचेरीमध्ये प्रचंड नुकसान

‘निवार’चेन्नई – दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘निवार’ चक्रीवादळाने पुडूचेरी, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात प्रचंड नुकसान केले आहे. या नुकसानाचा पुर्ण अंदाज अद्याप आलेला नाही. या आपत्तीत तमिळनाडूमध्ये तीन जणांचा आणि आंध्र प्रदेशात एकाचा बळी गेला. सुदैवाने किनारपट्टी भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याने मोठी जिवीतहानी टळली. या वादळाचा जोर आता ओसरला असला, तरी या वादळामुळे निर्माण झालेल्या वातावरणीय परिस्थितीमुळे आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, पुडूचेरीमध्ये आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दिल्ली, राजस्थानसह उत्तर भारतात पारा आणखी घसरेल, असे हवामानखात्याने म्हटले आहे.

भारतीय किनारपट्टीवर 1999 पासून धडकलेल्या 10 शक्तीशाली चक्रीवादळांपैकी ‘निवार’ ठरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. बुधवारी रात्री हे वादळ पुडूचेरीच्या किनाऱ्यावर धडकले. याआधी पुडूचेरी, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात धुंवाधार पावसाला सुरुवात झाली होती. याआधी 145 कीमी वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण सुदैवाने किनारपट्टीकडे सरकताना वादळाचा जोर ओसरत गेला. सुमारे 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे पुडूचेरी, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अनेक भागात घरांचे नुकसान झाले. हजारो झाडे उन्मळून पडली. वीजेचे खांब कोसळले.

‘निवार’

पुडूचेरी बहुतांश भागात तीन ते चार फूट पाणी साठले होते. पुडूचेरीमध्ये 237 एमएम पाऊस झाला. तसेच तमिळनाडूत 227 एमएम पावसाची नेोंद झाली. तलाव, नदी आणि धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात 164 ठिकाणी 60 एमएमपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या सबेपल्ली जिल्ह्यात सर्वाधिक 144 एमएम पावसाची नोंद झाली. अजूनही या राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. तसेच कर्नाटकातही जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

हवामानखात्याच्या अंदाजानुसार या वादळाच्या प्रभावामुळे दक्षिण भारतात आणखी दोन दिवस मुळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पावसाच्या सरी कोळसतील. ईशान्यकडे मिझोराम आणि त्रिपूरामध्येही मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असेही हवामानखात्याने म्हटले आहे. याशिवाय उत्तर भारतामध्ये पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. सध्या काश्‍मीर आणि हिमालयीन क्षेत्रात हिमवृष्टी होत आहे. यामुळे उत्तर भारतात थंडी वाढली आहे. ही थंडी आणखी वाढेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी ‘निवार’ वादाळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून असून पुडूचेरी, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशांच्या सरकारांशी संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

leave a reply