‘तौक्ते’ चक्रीवादळ; मुसळधार पाऊस आणि जोरदार वार्‍याने कोकण किनारपट्टीला झोडपले

नवी दिल्ली/मुंबई – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे आलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वार्‍याने सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला झोडपून काढले. या आपत्तीत सहा जणांचा बळी गेला आहे. ताशी १०८-११४ मैल वेगाने वाहणार्‍या वार्‍यांमुळे शेकडो घरांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात झाडेही उन्मळून पडली. मुंबईत मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. याशिवाय राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, धुळे, सातारा, अकोला, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस झाला.

‘तौक्ते’ चक्रीवादळ मुसळधार पाऊस आणि जोरदार वार्‍याने कोकण किनारपट्टीला झोडपले‘तौक्ते’ चक्रीवादळाने गुजरातच्या दिशेने जाताना गेल्या दोन तीन ते चार दिवसात केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. कर्नाटकात यामुळे सहा जणांचा बळी गेला होता, तर गोव्यात दोन जण दगावले होते. कोकण किनारपट्टीवरून गुजरातच्या दिशेने जाताना ‘तौक्ते’ चक्रीवादळाचे वेग आणखीन वाढल्याने कोकणात या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव दिसून आला. सुमारे अडीच हजार घरांची या वादळात मोडतोड झाली. तसेच शेकडोंच्या संख्येने झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातच सुमारे १८०० घरांचे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात चार जणांचा बळी गेला असून सिंधुदूर्ग, नवी मुंबई, उल्हासगरमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे.

सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर या कोकण किनारपट्टीवर जिल्ह्यांत वार्‍याचा वेग अफाट होता. रत्नागिरी, रायगडमध्ये वार्‍याचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटर इतका होता. तर मुंबईत वार्‍याचा वेग ताशी १०८ ते ११४ किलोमीटरवर होता. मुंबईत दृष्यमानता कमी असल्याने विमानतळ बंद करण्यात आले. तसेच काही ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही ठप्प झाली होती. तसेच कित्येक भागात ताडपत्री, पत्र्यांची छपरे जोरदार वार्‍यामुळे उडून गेली. मुंबईत तात्पुरत्या काळासाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर्सचेही मोठे नुकसान झाले आहे. यातील काही कोविड सेंटर्समधून ऑक्सिजन व व्हेंटिलेटरवर असणार्‍या ५०० हून अधिक रुग्णांना रविवारीच इतरत्र हलविण्यात आले होते. त्यामुळे मोठी आपत्ती टळली.

सोमवारी सायंकाळी ९ वाजल्यानंतर गुजरातच्या सौराष्ट्रात ‘तौक्ते’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात झाली. यावेळी या वादळाचा वेग १८५ किलोमीटर प्रती तासाहून अधिक होता. यामुळे गुजरातच्या भरूच, पोरबंदर, भावनगरला मोठ्या प्रमाणात वादळी वारे व पावसाचा तडाखा बसला आहे. याशिवाय सूरत, अहमदाबाद, वडोदरा, जामनगरमध्येही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. वादळ शक्तीशाली झाल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर गुजरात प्रशासनाने किनारपट्टीवरील भागातून सुमारे दीड लाखांहून अधिकजणांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

leave a reply