चिनी जनतेच्या आक्रमक निदर्शनांनंतर कम्युनिस्ट राजवटीकडून ‘झीरो कोविड पॉलिसी’ शिथिल करण्याचा निर्णय

राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी माघार घेतल्याचे संकेत

Covid Policyबीजिंग – कोरोना रोखण्यासाठी राबविलेल्या ‘झीरो कोविड पॉलिसी’विरोधात चिनी जनतेने दाखविलेल्या उद्रेकाची दखल घेणे अखेर कम्युनिस्ट पार्टीला भाग पडले आहे. गेल्या आठवड्यापासून रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने करणाऱ्या चीनच्या जनतेवरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. कम्युनिस्ट पार्टीने सूत्रे हाती घेतल्यानंतर जनतेतील असंतोषामुळे निर्णय मागे घ्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ ठरते. या घटनेने गेल्या महिन्यातच कम्युनिस्ट पार्टी व चीनवर सर्वाधिकार मिळविणाऱ्या शी जिनपिंग यांचे नेतृत्त्व कमकुवत झाल्याचे संकेत मिळत आहेत, असा दावा विश्लेषकांनी केला.

xi-jinping‘झीरो कोविड पॉलिसी’च्या कडक अंमलबजावणीमुळे घडलेल्या दुर्घटनांमुळे भडकलेली चिनी जनता गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरली होती. सलग पाच दिवसांहून अधिक काळ चीनच्या दहापेक्षा अधिक प्रमुख शहरांमध्ये निदर्शने सुरू होती. यात राजधानी बीजिंगसह, शांघाय व ग्वांगझोऊ यासारख्या आघाडीच्या शहरांचा समावेश होता. ऑनलाईन सेन्सॉरशिप व सुरक्षादलांच्या माध्यमातून उगारलेला कारवाईचा बडगाही चिनी जनतेला रोखू शकला नाही. त्यामुळे चीनच्या सत्ताधारी राजवटीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. चीनच्या आजीमाजी अधिकाऱ्यांनीही नवे आंदोलन व निदर्शने अभूतपूर्व घटना असल्याची प्रतिक्रिया नोंदविली होती.

या पार्श्वभूमीवर बुधवारी चीनच्या सत्ताधारी राजवटीने ‘झीरो कोविड पॉलिसी’तील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. राजधानी बीजिंग, ग्वांगझोऊ, झेंगझोऊ व चोंगकिंग या शहरांमधील प्रशासनाकडून यासंदर्भातील निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना ‘क्वारंटाईन सेंटर’मध्ये न जाता घरीच थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही शहरांमध्ये शाळा व इतर व्यवहार सुरू करण्यात आले असून कार्यक्रम व समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून देशभरातील निर्बंध शिथिल होऊन सर्व व्यवहारांना सुरुवात होईल, असे संकेतही देण्यात आले आहेत.

Zero Covid Policyगेल्या दोन महिन्यांपासून चीनची राजधानी बीजिंगसह इतर आघाडीच्या शहरांमधील कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे चीन सरकारने ‘झीरो कोविड पॉलिसी’अंतर्गत लादलेले निर्बंध अधिक कठोर केले होते. अनेक भागांमध्ये लॉकडाऊनचा कालावधीही वाढविण्यात आला होता. नागरी वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी अडथळे उभारून नागरिकांच्या हालचाली पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. अशातच झिंजिआंगमधील आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीसाठी कोरोना निर्बंध कारणीभूत असल्याचे समोर आल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला.

या उद्रेकानंतर सुरुवातीच्या दोन दिवसात चीनच्या यंत्रणांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन चिरडण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतरही नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या घटना कायम राहिल्याने सत्ताधारी राजवटीसह सुरक्षादलांना मोठा धक्का बसला. नागरिक सुरक्षादलांना न जुमानता अडथळे तोडून दगडफेक करीत असल्याच्या घटनांनी सत्ताधारी राजवटीला उघड आव्हान मिळाल्याचे दिसून आले. त्याचवेळी निदर्शनांमध्ये कम्युनिस्ट पार्टी व जिनपिंग यांच्याविरोधात देण्यात आलेल्या घोषणांमुळे जनतेचा उद्रेक टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. आर्थिक पातळीवर सर्व काही आलबेल नसताना होणारा जनतेचा हा उद्रेक धोक्याची घंटा ठरु शकते, याची जाणीव झाल्याने राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी माघार घेतली असावी, असा दावा विश्लेषक करीत आहेत.

हिंदी

leave a reply