चीनच्या लष्कराकडून युद्धासाठी पूर्णत: सज्ज असल्याची घोषणा

तैपेई – ‘तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे बंडखोर आणि तैवानमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या परदेशी शत्रूविरोधात कधीही व कुठेही युद्ध करण्यासाठी आमचे लष्कर पूर्णत: सज्ज आहे’, अशी घोषणा चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने केली. तैवानला घेरणारा तीन दिवसांचा युद्धसराव संपल्यानंतर चीनच्या लष्कराने ही धमकी दिली. तर तैवानच्या हद्दीत विमाने, विनाशिका घुसविण्याची कारवाई आशियातील जबाबदार देश म्हणून चीनला अजिबात शोभत नाही, अशी टीका तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी केली.

चीनच्या लष्कराकडून युद्धासाठी पूर्णत: सज्ज असल्याची घोषणातैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा करणाऱ्या चीनने राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन आाणि अमेरिकन सभापतींमधील भेटीविरोधात इशारा देण्यासाठी मोठ्या युद्धसरावाची घोषणा केली होती. गेल्या तीन दिवसात चीनची जवळपास दोनशे विमाने आणि २० हून अधिक विनाशिकांनी तैवानच्या आखातात घुसखोरी केली. तैवानने देखील आपली हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करुन चीनच्या विमानांना पिटाळून लावले. पण आत्ता चीनचे लष्कर उघडपणे तैवानवर हल्ल्याच्या धमक्या देत आहेत.

पण युद्धसराव संपला असला तरी चीनच्या नऊ विनाशिका, गस्तीनौका अजूनही आपल्या सागरी हद्दीत टिकून असल्याचा आरोप तैवानने केला आहे. तसेच तैवानच्या राष्ट्राध्यक्षा म्हणून देशहितासाठी अमेरिकेला भेट देणे, हा संपूर्ण माझा निर्णय असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी चीनला चपराक हाणली.

leave a reply