‘डेल्टा व्हेरिअंट’मुळे आफ्रिकेतील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची तीव्रता वाढली – दोन महिन्यात साडेसहा लाखांहून अधिक रुग्ण

केपटाऊन – ‘कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा आफ्रिकेतील वेग व व्याप्ती अभूतपूर्व ठरली आहे. दर तीन आठवड्यांनी कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. गेल्या आठवड्यात आफ्रिका खंडात दोन लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापुढील काळ कोरोनाच्या साथीतील आफ्रिकेचा सर्वाधिक वाईट काळ असेल, असे संकेत मिळत आहेत’, अशी गंभीर चिंता ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या (डब्ल्यूएचओ) वरिष्ठ अधिकारी डॉक्टर मात्शिदिसो मोएती यांनी व्यक्त केली आहे. आफ्रिकेतील या गंभीर स्थितीमागे ‘डेल्टा व्हेरिअंट’ कारणीभूत ठरला असून आतापर्यंत 16 आफ्रिकी देशांमध्ये तो पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘आफ्रिका सीडीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, खंडातील कोरोना रुग्णांची संख्या 54 लाखांनजिक जाऊन पोहोचली आहे. साथीचा सर्वाधिक फटका दक्षिण आफ्रिका देशाला बसला असून रुग्णसंख्या तब्बल 19 लाख 13 हजारांवर गेली आहे. मोरोक्कोतील रुग्णसंख्या 5 लाख 29 हजारांवर गेली असून, ट्युनिशिआतील रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा पार केला आहे. युगांडात गेल्या दोन महिन्यात सुमारे 30 हजार रुग्ण आढळले असून 18 जूनपासून ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली आहे. लायबेरियातील रुग्णसंख्येत अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 300 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

आफ्रिका खंडात कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या एक लाख, 40 हजारांवर गेली आहे. गेले दीड महिने प्रत्येक आठवड्यात बळींच्या संख्येत 15 टक्क्यांची भर पडते आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आफ्रिका खंडात तीन हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. याच काळात आफ्रिकेत कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांची संख्या 42 टक्क्यांनी वाढल्याचेही समोर आले आहे. आरोग्याशी निगडित उपाययोजनांची अंमलबजावणी न होणे व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ हे आफ्रिकेतील रुग्णवाढीचे प्रमुख कारण ठरल्याची माहिती अमेरिकेच्या ‘जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी’ने दिली आहे.

आफ्रिकेतील तिसर्‍या लाटेच्या वाढत्या वेगामागे अपुरे लसीकरण हादेखील महत्त्वाचा घटक ठरला आहे. आफ्रिकेची एकूण लोकसंख्या 1.3 अब्जांच्या आसपास असून आतापर्यंत फक्त एक कोटी 50 लाख जणांचे लसीकरण झाले आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण जेमतेम 1.2 टक्के असल्याकडे आरोग्य यंत्रणांनी लक्ष वेधले. ‘डब्ल्यूएचओ’च्या ‘कोव्हॅक्स स्कीम’नुसार डिसेंबर महिन्यापर्यंत आफ्रिका खंडाला 70 कोटी कोरोना लसी पुरविण्यात येणार आहेत. जून महिन्यापर्यंत त्यातील फक्त 6.5 कोटी आफ्रिकी देशांना मिळाल्या आहेत.

युरोपला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा फटका बसणे अटळ – ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चा इशारा 

कोपनहेगन – युरोपियन जनता व सरकारांनी शिस्त पाळली नाही तर युरोप खंडात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ असून त्याचे संकेत मिळू लागले आहेत, असा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. युरोप खंडातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट थांबली असून गेल्या आठवड्यात रुग्णांच्या संख्येत 10 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती ‘डब्ल्यूएचओ युरोप’चे प्रमुख हॅन्स क्लुग यांनी दिली.

‘स्टॅटिस्टा’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, युरोपातील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या पाच कोटींहून अधिक असून सुमारे 13 लाख जणांचा बळी गेला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रशिया, ब्रिटन व पोर्तुगाल यासारख्या देशांमध्ये रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रशिया व ब्रिटनमध्ये सलग तीन दिवस 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. युरोपातील सर्वाधिक रुग्णांची नोंद फ्रान्समध्ये झाली असून या देशात 57 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर रशियामध्ये सर्वाधिक एक लाख, 34 हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे.

leave a reply