भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चेत अफगाणिस्तानकडून सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीची मागणी

नवी दिल्ली/काबुल – अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे घर तालिबानने बॉम्बस्फोटाद्वारे उडवून दिल्यानंतर, अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. तालिबानचा हिंसाचार वाढत असताना, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची अफगाणिस्तानविषयक तातडीची बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी यावेळी परराष्ट्रमंत्री अत्मर यांनी केली. भारताने अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त करून याचा भारताच्या सुरक्षेवर थेट परिणाम होत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे लवकरच सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानवर चर्चा होईल, असे संकेत मिळत आहेत.

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चेत अफगाणिस्तानकडून सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीची मागणीपरराष्ट्रमंत्री अत्मर यांनी सोशल मीडियावर स्वतःच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याबरोबरील चर्चेची माहिती दिली. तालिबानच्या हिंसाचारामुळे निर्माण झालेल्या अफगाणिस्तानातील विदारक परिस्थितीची कल्पना आपण भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना करून दिली, असे अत्मर यांनी म्हटले आहे. तालिबानचा हिंसाचार रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ व आंतरराष्ट्रीय समुदायाने अधिक महत्त्वाची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा परराष्ट्रमंत्री अत्मर यांनी व्यक्त केली.

अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इतर देशांच्या राजदूतांना तालिबानच्या हिंसाचाराची माहिती दिली. तालिबानबरोबर पाकिस्तानपुरस्कृत ‘लश्कर-ए-तोयबा’ व ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटना देखील अफगाणिस्तानात सक्रीय असल्याचे मोहम्मद अत्मर यांनी इतर देशांबरोबरील चर्चेत स्पष्ट केले. परराष्ट्रमंत्री जयशंकर व परराष्ट्रमंत्री अत्मर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत पातळीवर माहिती दिलेली नाही. पण सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद आलेले असताना, भारत अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर तातडीच्या बैठकीचे आयोजन करू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चेत अफगाणिस्तानकडून सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीची मागणीएकाच दिवसापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना, संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत तिरूमुर्ती यांनी अफगाणिस्तनातील हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त केली होती. अफगाणिस्तानातील घडामोडींचा भारताच्या सुरक्षेवर थेट परिणाम संभवतो, असे राजदूत तिरूमुर्ती म्हणाले होते. तसेच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनीही अफगाणिस्तानातील तालिबान तसेच परदेशी दहशतवादी गटांकडून केल्या जाणार्‍या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या घरात स्फोट झाल्यानंतर, सुरक्षा परिषद तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला याची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने या घातपाताची जबाबदारी स्वीकारली असून यामुळे तालिबानला अफगाणिस्तानची समस्या वाटाघाटींद्वारे सोडवायची नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

अशा परिस्थितीत, सुरक्षा परिषदेची अफगाणिस्तानविषयक चर्चा खूपच महत्त्वाची ठरेल. या चर्चेत तालिबानला पाकिस्तानकडून अवैधरित्या मिळणार्‍या सहाय्याचा मुद्दाही ऐरणीवर येईल. तसेच पाकिस्तानच्या लष्कराचे जवान व अधिकारी अफगाणिस्तानात तालिबानच्या बाजूने लढत आहेत, ही बाब देखील यामुळे जगासमोर अधिक प्रकर्षाने येऊ शकेल. ‘लश्कर’ व ‘जैश’ सारख्या दहशतवादी संघटनांचा वापर करून पाकिस्तान तालिबानला सहाय्य करीत आहे, हे सिद्ध करण्याची आणखी एक संधी यामुळे भारत व अफगाणिस्तानला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तानविषयक बैठक पार पडली तर त्याचे दूरगामी परिणाम समोर येऊ शकतील.

leave a reply