कोरोना निर्बंधांच्या विरोधात चीनमधील ‘आयफोन फॅक्टरी’त निदर्शने

‘झीरो कोविड पॉलिसी’त बदल करण्याचा नाणेनिधीचा सल्ला

gita-gopinathबीजिंग – चीनमधील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याने सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने साथीविरोधातील निर्बंध अधिकच तीव्र केले आहेत. सत्ताधारी राजवटीच्या या कठोर निर्बंधांविरोधात जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जगातील सर्वात मोठी ‘आयफोन फॅक्टरी’ असलेल्या झेंगझोऊ शहरात कोरोना निर्बंधांविरोधात कामगारांनी निदर्शने केली. निर्बंध शिथिल करावेत तसेच अतिरिक्त पैसे द्यावेत अशा मागण्या कामगारांनी केल्याचे सांगण्यात येते. कोरोना साथीविरोधात चीनकडून राबविण्यात येणाऱ्या ‘झीरो कोविड पॉलिसी’च्या अंमलबजावणीचे पडसाद जागतिक स्तरावरही उमटले आहेत. कोरोनासंदर्भातील कडक धोरणात बदल करावेत, असा सल्ला नाणेनिधीने चीनला दिला आहे.

Demonstrations at iPhone Factoryगेल्या काही दिवसांपासून चीनमधील कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारी चीनमध्ये 25 हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. मंगळवारी रुग्णसंख्या 29 हजारांवर गेली असून राजधानी बीजिंगसह प्रमुख शहरांमध्ये ही वाढ दिसून आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विविध शहरांमध्ये लॉकडाऊन लागू असतानाही रुग्णसंख्येत भर पडत असल्याने चिनी यंत्रणांसमोरील आव्हान अधिकच तीव्र झाले आहे. कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या व्हेरिअंटचे वेगवेगळे उपप्रकार चीनमध्ये आढळले असून काही प्रकार परदेशातून इथे आल्याचेही सांगण्यात येते.

या पार्श्वभूमीवर सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट ‘झीरो कोविड पॉलिसी’वरच जोर देत असून त्याची अधिकाधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र कोरोनामुळे लागू झालेल्या निर्बंधांना चिनी जनता कंटाळली असून विविध भागांमध्ये सरकारविरोधात असंतोषाचा उद्रेक होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात झेंगझोऊ शहरासह ग्वांगझाऊ तसेच तिबेटमध्ये निदर्शने झाल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते. झेंगझोऊ शहरात असलेल्या ‘आयफोन’च्या कारखान्यातून शेकडो कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. याच कारखान्यात पुन्हा एकदा कामगारांच्या नाराजीचा उद्रेक झाला आहे.

iPhone Factoryनिर्बंधांना कंटाळलेल्या कामगारांनी बुधवारी जोरजोरात घोषणाबाजी करून निदर्शने सुरू केली. यात निर्बंध शिथिल करणे, कोरोना काळात अधिक सुविधा पुरविणे तसेच वेतन यासंदर्भातील मागण्यांचा समावेश होता. कामगार व सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याचेही समोर आले आहे. झेंगझोऊ सारखे औद्योगिक केंद्र असलेल्या शहरातील फॅक्टरीत झालेली ही निदर्शने, कम्युनिस्ट राजवटीने जबरदस्तीने लादलेल्या निर्बंधांवर आलेली संतप्त प्रतिक्रिया असल्याचे सांगण्यात येते. चीनच्या जनतेबरोबरच जागतिक स्तरावरूनही ‘झीरो कोविड पॉलिसी’विरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत.

‘झीरो कोविड पॉलिसीची अंमलबजावणी झटपट व वेगाने होत असली तरी कोरोनाचे नवे प्रकार व लसीकरणातील शिथिलता यामुळे सातत्याने निर्बंध लादण्याची वेळ ओढवत आहे. याचे परिणाम उत्पादनांचे मागणी, गुंतवणूक तसेच गृहबांधणी क्षेत्रावर दिसून येत आहेत. पुढील पावले उचलताना चीनने आपल्या कोरोनासंदर्भातील धोरणांमध्ये बदल करण्याची गरज आहे. चीनने अधिक तयारी करायला हवी व लसीकरणाचा वेगही वाढवायला हवा’, असा सल्ला नाणेनिधीच्या वरिष्ठ अधिकारी गीता गोपीनाथ यांनी दिला.

leave a reply