तेल अविव शहरासह इस्रायलचा दिमोना प्रकल्प नष्ट करू

- इराणची इस्रायलला धमकी

दिमोनातेहरान – ‘इस्रायलची लढाऊ विमाने इराणच्या नातांझ अणुप्रकल्पावर हल्ल्ला चढविण्यात यशस्वी ठरलीच तर पुढच्या सात मिनिटांमध्ये इराण इस्रायलमध्ये क्षेपणास्त्रांचा वर्षाव करील. यामुळे इस्रायलचे तेल अविव शहर जमिनदोस्त होऊन इस्रायलचा दिमोना अणुप्रकल्प पूर्णपणे नष्ट होईल’, अशी धमकी इराणने दिली आहे. इराणच्या प्रसारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पत्रकार युनूस शादलो यांनी यासंबंधीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्याचबरोबर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी 11 वर्षांपूर्वी इस्रायलला दिलेली धमकी देखील या व्हिडिओत दाखविण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिका व इस्रायलच्या हवाईदलांचा सराव पार पडला होता. यामध्ये पर्शियन आखातातील इराणच्या गस्ती जहाजांबरोबर इराणच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा अभ्यास दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांनी केला. यामध्ये अमेरिकेच्या एफ-15 तर इस्रायलच्या एफ-35 या स्टेल्थ लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाईदलात पार पडलेल्या युद्धसरावाला लक्ष्य करून इराण सरकारसंलग्न ‘आयआरआयबी’ वृत्तवाहिनीसाठी काम करणारे पत्रकार युनूस शादलो यांनी ही धमकी देणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला.

इराणच्या विरोधाशिवाय इस्रायलची लढाऊ विमाने नातांझ अणुप्रकल्पाच्या हद्दीपर्यंत पोहोचली आणि ही विमाने अणुप्रकल्पावर हल्ला चढविण्यात व ते नष्ट करण्यात यशस्वी ठरली, असे आपण गृहित धरले आणि हल्ल्यानंतर इस्रायलची विमाने इराणच्या हवाईहद्दीतून सुरक्षित बाहेर पडली, मानले.या विमानांना इस्रायलमधील तळ गाठण्यासाठी एक तासाचा कालावधी लागेल. त्याच्या आधीच, अगदी सात मिनिटांमध्ये इराणची डेझफूल आणि खैबर क्रशर ही क्षेपणास्त्रे इस्रायलला अचूकरित्या लक्ष्य करतील’, असा दावा या पत्रकाराने केला आहे.

leave a reply