अफगाणिस्तानातील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानमधील मतभेद उघड

तालिबानमधील मतभेदकाबुल – काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढवून ४० जणांचा बळी घेतला. यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात युद्ध पेटले तर ते कुणाच्याही भल्याचे नसेल, असे तालिबानने धमकावले होते. अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढविणार्‍या पाकिस्तानला याची किंमत मोजावीलागेल, अशी धमकी तालिबानमधील मोठे नेते व कमांडर्स देत आहेत. पण हक्कानी नेटवर्कसारख्या पाकिस्तानसमर्थक तालिबानी गटाने, पाकिस्तानशी चर्चा करून हा वाद सोडवावा, अशी भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रश्‍नावर तालिबानमधील मतभेद वाढू लागल्याचे दिसत आहे.

गेल्या आठवड्यात १६ एप्रिल रोजी पाकिस्तानच्या हवाईदलाने अफगाणिस्तानच्या कुनार आणि खोस्त या दोन प्रांतात हवाई हल्ले चढविले. ड्युरंड लाईन ओलांडून पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढविणार्‍या तेहरिक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांच्या अफगाणिस्तानातील ठिकाणांना केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण या हल्ल्यात बळी गेलेल्या ४० जणांमध्ये अफगाणी महिला व मुलांचा समावेश होता. पाकिस्तानच्या या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका झाली होती.

तालिबानमधील मतभेदतालिबानने याची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. पाकिस्तानला याचा जाब विचारला जाईल, असे तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने बजावले होते. त्याचबरोबर या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटू शकते, असे सांगून मुजाहिद याने पाकिस्तानला परिणामांची जाणीव करून दिली होती. गेल्या आठवड्यातील हवाई हल्ल्यानंतर अफगाणी जनतेने पाकिस्तानच्या विरोधात तीव्र निदर्शने केली होती. या निदर्शनात पाकिस्तानला धडा शिकविण्याची मागणी जनतेने तालिबानकडे केली आहे.

तालिबानमधील मतभेदअशा परिस्थितीत तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांची विशेष बैठक पार पडली. यामध्ये तालिबानच्या राजवटीचा उपपंतप्रधान मुल्ला घनी बरादर, संरक्षणमंत्री मुल्ला याकूब, उपसंरक्षणमंत्री मुल्ला फझ्ल आणि लष्करप्रमुख मौलवी फसिहुदद्दीन फितरत यांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याची मागणी केली. पण हक्कानी नेटवर्कचा प्रमुख व तालिबानच्या राजवटीत अंतर्गत सुरक्षामंत्री असलेला सिराजुद्दीन हक्कानी आणि शिक्षणमंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी पाकिस्तानच्या विरोधातील कारवाईला विरोध केला. त्यापेक्षा पाकिस्तानशी चर्चा करण्याचा प्रस्ताव सिराजुद्दीन हक्कानीने मांडला.

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या हातातील बाहुले असलेल्या हक्कानी नेटवर्कच्या या भूमिकेवर तालिबानमधील इतर नेत्यांनी टीका केली. याआधीही हक्कानी नेटवर्कने ड्युरंड लाईनवर पाकिस्तानी लष्कराविरोधात कारवाई करणार्‍या तालिबानी कमांडर्सचा निषेध केला होता. यामुळे तालिबानच्या वरिष्ठ नेतृत्वात पाकिस्तानबाबतच्या धोरणावरून मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान, तालिबानमधील मतभेद अफगाणिस्तानातील अस्थैर्यात वाढ करतील, अशी चिंता अमेरिकी माध्यमांनी याआधी व्यक्त केली होती. पाकिस्तानबाबतच्या धोरणावरून तालिबानमध्ये निर्माण झालेले मतभेद ही चिंता प्रत्यक्षात उतरू लागल्याचे संके देत आहेत.

leave a reply