‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून सहा तासात ४० हजार घातक रासायनिक शस्त्रांचा शोध

लंडन – अमेरिकेतील एका औषधनिर्मिती कंपनीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून अवघ्या सहा तासात ४० हजार रासायनिक शस्त्रांचा शोध घेतल्याचा दावा केला आहे. औषधांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून हा शोध लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रयोगादरम्यान अत्यंत घातक ‘नर्व्ह एजंट’ असलेल्या ‘व्हीएक्स’ या रासायनिक शस्त्राच्या संयुगाचीही निर्मिती झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. आर्टिफिशल इंटेलिजन्स-एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा संभाव्य गैरवापर या विषयावर आयोजित एका परिषदेच्या तयारीचा भाग असलेल्या प्रयोगात रासायनिक शस्त्रांची निर्मिती झाल्याची माहिती देण्यात आली.

स्वित्झर्लंडच्या ‘स्पाईझ लॅबोरेटरी’ने ‘वेपनाईझ्ड् केमिकल्स’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेच्या तयारीचा भाग म्हणून ‘कोलॅबरेशन्स फार्मास्युटिकल्स’ या अमेरिकी कंपनीने एक ‘थॉट एक्सपरिमेंट’ केला. या प्रयोगाअंतर्गत कंपनीकडून नव्या औषधांच्या ‘व्हर्च्युअल डिझायनिंग’ व ‘टेस्टिंग’साठी वापरण्यात येणार्‍या ‘मेगासिन’ या एआयचा वापर करण्यात आला. या ‘एआय’ला जगभरात उपलब्ध असलेल्या रसायनांची माहिती (डाटाबेस) देण्यात आला होता.

त्यातील विषारी रसायने व संयुगांचा शोध घेण्याची जबाबदारी ‘मेगासिन’वर सोपविण्यात आली होती. या ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ने अवघ्या सहा तासात ४० हजार रासायनिक शस्त्रास्त्रे तयार होतील, असे घटक व संयुगे शोधून काढली, अशी माहिती अमेरिकी कंपनीने दिली. हा सर्व प्रयोग विज्ञानविषयक साप्ताहिक म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘नेचर’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्या वेगाने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञानाने रासायनिक शस्त्रांचा शोध घेतला ते आश्‍चर्यजनक आहे, असा दावा संशोधक फॅबिओ उर्बिना यांनी केला.

‘आमची कंपनी छोटी आहे व एआय तंत्रज्ञान तुलनेत नवीन आहे. असे असतानाही मोठ्या प्रमाणात रासायनिक शस्त्रांचा शोध लागणे, ही बाब काळजी निर्माण करणारी आहे. आमच्यासारख्या शेकडो कंपन्या आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर औषधे व रसायनांच्या निर्मितीसाठी करत असतील’, अशा शब्दात उर्बिना यांनी चिंता व्यक्त केली.

गेल्या काही वर्षात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’च्या वापरावरून जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, ज्येष्ठ अमेरिकी मुत्सद्दी हेन्री किसिंजर, आघाडीचे अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’वरून सातत्याने इशारे दिले आहेत. या तंत्रज्ञानाचा वाढता वापर मानवी समाजासमोर गंभीर आव्हाने उभी करेल व संघर्षांनाही कारणीभूत ठरेल, असे बजावण्यात आले होते. अमेरिकी कंपनीच्या प्रयोगादरम्यान झालेली घातक रासायनिक शस्त्रांची निर्मिती त्याला दुजोरा देणारी ठरते.

leave a reply