काबुल रुग्णालयातील दुहेरी बॉम्बस्फोटात १९ जणांचा बळी

१९ जणांचा बळीकाबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये लष्करी रुग्णालयात झालेले बॉम्बस्फोट आणि गोळीबार यामध्ये १९ जणांचा बळी गेला असून ५० जण जखमी झाले. गेल्या काही दिवसांपासून तालिबानने आयएसविरोधात सुरू केलेल्या कारवाईला उत्तर म्हणून आयएसच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविल्याचा दावा केला जातो. तालिबानने अद्याप या हल्ल्यासाठी कुणालाही जबाबदार धरलेले नाही. दरम्यान, तालिबान आणि आयएस या दोन दहशतवादी संघटनांमधील संघर्षात अफगाणी जनतेचा दैना उडत असल्याचे दिसू लागले आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होईल, असा दावा करणारे पाकिस्तानसारखे देश यामुळे तोंडघशी पडले आहेत.

मंगळवारी सकाळी काबुलच्या वझिर अकबर खान भागातील ‘सरदार मोहम्मद दाऊद खान’ लष्करी रुग्णालयावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. सुरुवातीला दहशतवाद्यांनी रुग्णालयाच्या मुख्यद्वारावरील सुरक्षा चौकीजवळ कारबॉम्बस्फोट केला. यानंतर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत रुग्णालयाच्या इमारतीत प्रवेश केला. येथील प्रत्येक वॉर्डात घुसून दहशतवाद्यांनी दिसेल त्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्याचे, परिचारिकेने सांगितले. हा गोळीबार सुरू असतानाच रुग्णालयाच्या आवारात आणखी एक बॉम्बस्फोट झाला.

१९ जणांचा बळीआंतरराष्ट्रीय माध्यमे दुहेरी बॉम्बस्फोट असल्याचा दावा करीत आहेत. तर अफगाणी वर्तमानपत्राने प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने यापैकी एक आत्मघाती स्फोट होता, असे म्हटले आहे. या स्फोटात किती बळी गेले? कोणी हल्ले चढविले? याची माहिती देण्याचे तालिबानने टाळले होते. गेल्या दोन महिन्यांपासून तालिबानच्या नियंत्रणाखाली गेलेल्या अफगाणिस्तानातील आघाडीच्या वृत्तवाहिनीने देखील या स्फोटाबाबत अधिक माहिती देण्याचे टाळले.

गेल्या दशकभरात या लष्करी रुग्णालयावर झालेला हा तिसरा मोठा हल्ला ठरतो. याआधी २०१७ साली झालेल्या हल्ल्यामध्ये ३० जणांचा बळी गेला होता. काही तासांसाठी चाललेल्या या भीषण हल्ल्याची जबाबदारी आयएसने स्वीकारली होती. त्यावेळी आयएसच्या दहशतवाद्यांनी रुग्णांना ओलिस धरण्याचा प्रयत्न केला होता. तर २०११ साली तालिबानच्या दहशतवाद्याने या रुग्णालयावर चढविलेल्या आत्मघाती १९ जणांचा बळीहल्ल्यात २६ जणांचा बळी गेला होता.

गेली वीस वर्षे तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील लोकनियुक्त सरकार आणि पाश्‍चिमात्य लष्कराला लक्ष्य करीत होते. तर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून गेल्या अडीच महिन्यांमध्ये आयएसचे दहशतवादी हल्ले चढवून तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करीत आहेत. आयएसने मंगळवारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र या हल्ल्यामागे आयएस असावी असा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.

राजधानी काबुलसह नांगरहार, हेरात या प्रांतांमध्ये तालिबान आणि आयएसच्या दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. तालिबानचे दहशतवादी काबुलमधून आसयएसच्या दहशतवाद्यांना अटक केल्याचा दावा करीत आहेत. तर नांगरहार प्रांतात आयएसचे दहशतवादी तालिबानला लक्ष्य करीत आहेत. पण या संघर्षामुळे अफगाणी जनतेची दैना उडाली असून आपल्या या स्थितीसाठी तालिबानला सहाय्य करणारा पाकिस्तान जबाबदार असल्याचा असंतोष अफगाणी जनता व्यक्त करीत आहे.

leave a reply