फोन, नोटांच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘डीआरडीओ’कडून अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझेशन कॅबिनेटची निर्मिती

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसपासून संरक्षणासाठी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या “डीआरडीओ” ने मोबाईल, लॅपटॉपसह नोटा निर्जंतुकीकरणासाठी ‘अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझेशन कॅबिनेट’ विकसित केले आहे. या उपकरणामुळे कोणत्याही संपर्काशिवाय वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) रिसर्च सेंटर इमारतने (आरसीआय) डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस) तयार केले. “डीआरयूव्हीएस’ कॅबिनेटमध्ये मोबाईल लॅपटॉप, आयपॅडसह अन्य वस्तू ठेवल्यावर त्यावर सर्व बाजूने अल्ट्राव्हायोलेट किरण सोडण्यात येतात. एकदा निर्जंतुकीकरण प्रकिया पूर्ण झाली की ही सिस्टम आपोआप बंद होते. त्यामुळे ऑपरेटरला डिव्हाइसच्या जवळ थांबण्याची आवश्यकता नसते. याशिवाय चलन, पासबुक, चेक, चलान यांच्या निर्जंतुकीकरणासाठी “नोट्सक्लीन ‘ हे उपकरण विकसित केले आहे. या उपकारणाच्या सहाय्याने नोटांचे पूर्ण बंडल एकाच वेळी निर्जंतुकीकरण करता येईल. कोरोनाव्हायरसची लागण होऊ नये यासाठी हात धुण्याचा सल्ला देण्यात येतो किंवा सॅनिटाईझरचा वापर करण्यास सांगण्यात येते. मात्र मोबाईल नोटा यांच्यासह इतर वस्तूंवर देखील विषाणू राहू शकतात त्यामुळे त्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी ही उपकरणें महत्वाची ठरतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाव्हायरसविरोधात लढा देत असलेल्या “डीआरडीओ”कडून मागील काही दिवसात वेगवेगळी उपकरणे विकसित करण्यात आली आहेत. याआधी “डीआरडीओ”कडून ‘ऑटोमॅटिक सॅनिटायझर’ आणि ‘अल्ट्राव्हॉयलेट डिव्हाइस’ या दोन उपकरणांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे घरातील वस्तू खुर्च्या, फाईल्स आणि फूड पॅकेट्सचे निर्जंतुकीकरण करता येते. यासह हॉटस्पॉट क्षेत्रात वेगाने निर्जंतुकीकरणासाठी ‘यूव्ही ब्लास्टर टॉवर’ची देखील निर्मिती डीआरडीओने केली आहे. याचबरोबर चाचणी किट, शरीर निर्जंतुकीकरणासाठी पर्सनल ‘सॅनिटाइझेशन इंक्लोजर्स’ (पीएसई) मशीन अशी उपकरणे तयार करण्यात आली आहेत.

कोरोनावर अद्याप लस सापडलेली नसल्याने विषाणूची लागण होऊ नये यासाठी आवश्यक खबररदरी घेणे हाच उपाय ठरत आहे. यादृष्टीने “डीआरडीओ” महत्वाची भूमिका बजावत आहे.

leave a reply