महाराष्ट्र, गुजरात आणि केरळमधून दोन हजार कोटींचे अमली पदार्थ पकडले

  • तस्करीमागे पाकिस्तानी माफियांचा हात असल्याचे चौकशीत उघड
  • गुजरातमधून सहा पाकिस्तानी व कोचीमध्ये सहा इराणी तस्करांना अटक

अमली पदार्थमुंबई/अहमदाबाद/कोची – भारतात अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रयत्न उद्ध्वस्त करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी जोरदार मोहीम उघडली असून शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात महाराष्ट्र, गुजरात व केरळ या राज्यांमध्ये दोन हजार कोटींहून अधिकचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवारी केरळच्या कोची बंदराजवळ अरबी समुद्रात भारत नौदल आणि नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) ऑपरेशन राबवून इराणी ट्रॉलरमधून 1200 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. तर गुजरातमध्ये एटीएस व तटरक्षकदलाने जखाऊ बंदराजवळ केलेल्या कारवाईत पाकिस्तानी बोटीतून 350 कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा पकडण्यात आला. मुंबईतही न्हावाशेवा बंदरात आयात फळांच्या एका कंटेनरमधून 502 कोटींचे कोकेन सापडले आहे. केरळ व गुजरातमध्ये पकडण्यात आलेल्या हेरॉईनच्या तस्करीमागे पाकिस्तानी माफिया असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

देशात अमली पदार्थांचे मोठे साठे सापडण्याचे सत्र सुरू असून सुरक्षा यंत्रणांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. एनसीबी, राज्य पोलिसांचे अमली पदार्थविरोधी विभाग, एटीएस, डीआरआय, तटरक्षकदल, तसेच नौदलही या अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी इतर यंत्रणांबरोबर समन्वयाने मोहीम राबवत आहे. सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी प्रचंड वाढल्याचे अहवालांमधून स्पष्ट होत असून अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर हे अमली पदार्थ येत आहेत. तसेच याद्वारे दहशतवाद्यांना पैशाचा पुरवठा केला जात असल्याचे विविध प्रकरणांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अशा टेरर फंडिंगशी निगडित प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) सुरू आहे.

अमली पदार्थशुक्रवारी कोची बंदराजवळ भर समुद्रात तस्करांकडून एका बोटीतून दुसऱ्या बोटीत हे अमली पदार्थ हस्तांतरित केले जात असताना नौदलाने 200 किलो हेरॉईनसह तस्करांना पकडले. पकिस्तानमधून एका पाकिस्तानी मच्छिमार बोटीतून हे अमली पदार्थ आणण्यात आले होते, त्यानंतर ते भारतीय सागरी सीमेत दाखल होण्याआधी इराणी मच्छिमार ट्रॉलरमध्ये हलविण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. हाजी सलिम या पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कराचे नावही चौकशीत समोर आले आहे. हाजी सलिम याची माफिया टोळी भारतात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी करीत आहे. 2021 साली कोचीमध्ये एनसीबीने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 337 किलो आणि 300 किलो इतके हेरॉईन पकडले होते. त्यावेळीही हाजी सलिमचे नाव समोर आले होते. गुप्तचर खात्याकडून पाकिस्तानातून भारत आणि श्रीलंकेत 400 किलोच्या हेरॉईनची तस्करी होणार असल्याची माहिती सुरक्षा व तपास यंत्रणांना मिळाली होती. कोचीजवळ सापडलेला अमली पदार्थाचा साठा तस्करीच्या या रॅकेटचाच भाग असावा, अशी शक्यता वर्तविली जाते.

कोचीबरोबर गुजरातच्या जखाऊ किनारपट्टीपासून 40 सागरी मैल अंतरावर समुद्रात ऑपरेशन राबवून हेरॉईनचा मोठा साठा पकडण्यात आला. गुजरात एटीएसला या तस्करीबाबात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर तटरक्षकदलाच्या सहाय्याने ही तस्करी उधळून लावण्यासाठी ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. 7 आणि 8 तारखेला ही मोहीम राबविण्यात आली. संशयित पाकिस्तानी बोटीवर लक्ष ठेवण्यात आले. ही बोट आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून पाच सागरी मैल भारतीय सीमेत आल्यावर ही बोट ताब्यात घेण्यात आली. तटरक्षकदलाची सी-429 आणि सी-454 ही जहाजे या मोहिमेसाठी तैनात करण्यात आली होती. या पाकिस्तानी बोटीत 50 किलो हेरॉईन सापडले. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 350 कोटी रुपये आहे. प्राथमिक तपासात मोहम्मद कादर नावाच्या पाकिस्तानी ड्रग माफियाचा हात यामध्ये असल्याचे उघड होत आहे. गुजरात किनारपट्टीवर उतरविल्यावर हे अमली पदार्थ पंजाब व उत्तर भारतात पाठविण्यात येणार होते.

गुजरात पोलिसांनी 2019 सालापासून 1975 किलो इतके अमली पदार्थ पकडले आहेत. तसेच 100 जणांना अटक केली असून यामध्ये 60 विदेशी तस्कर आहेत. या विदेशी तस्करांपैकी 39 जण पाकिस्तानी, 16 इराणी, चार अफगाणी आणि एक जण नायजेरीयन आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईनजिक न्हावाशेवा बंदरातही अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. 50.23 किलो कोकेन एका फळांच्या कंटेनरमधून ‘डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स’च्या (डीआरआय) पथकाने पकडले. समुद्रमार्गे आयात मालाच्या कंटेनरमधून डीआरआयने पकडलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कोकेन साठ्यापैकी हा एक साठा असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. फळांच्या खोक्यात कोकेनच्या विटा बनवून त्या लपवून ठेवण्यात आल्य

leave a reply