नवी मुंबईतून १५०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

दहा दिवसातील अमली पदार्थांच्या विरोधात दुसरी मोठी कारवाई

नवी दिल्ली/मुंबई -आयात केलेल्या संत्र्यांची मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमधून अमली पदार्थांचा मोठा साठा पकडण्यात आला. ‘डायरोक्टरेट जनरल ऑफ रिव्हेन्यू इंटिलिजन्स’ने (डीआरआय) मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 1500 कोटी रुपये इतकी आहे. दहा दिवसांपूर्वीच उरणच्या न्हावाशेवा बंदरातून 1700 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

Drugs worthआफ्रिकेतून व्हॅलेन्सिया संत्र्यांची आयात करण्यात आली होती. उरण बंदरात उतरलेला या मालाला सीमाशुल्क विभागाकडून क्लिअरन्स मिळाल्यावर ही संत्री एका ट्रकमध्ये भरून वाशी येथील एका शीतगृहामध्ये ठेवण्यासाठी घेऊन जाण्यात आली. मात्र या संत्र्यांच्या आडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची खबर डीआरआयला मिळाली. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने जलदगतीने कारवाई करून डीआरआयच्या अधिकाऱ्याने वाशी येथे हा ट्रक अडवला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘मेथॅम्फेटामाइन’ हे सिंथेटिक ड्रग आढळले.

संत्र्यांच्या खोक्यांमध्ये हे अमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार ट्रकमधून उच्च दर्जाचे 198 किलो क्रिस्टल ‘मेथॅम्फेटामाइन’ सापडले. तसेच उच्च दर्जाचे 9 किलो कोकेनही या ट्रकमध्ये लपविण्यात आले होते. या एकूण साठ्याची किंमत 1,476 कोटी रुपये इतकी आहे. संत्र्याच्या वाहतुकीच्या आड अशारितीने पहिल्यांदाच अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे.

यासंदर्भात काही जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये या संत्र्यांच्या आयातीशी निगडित असलेल्यांचा समावेश आहे. त्यांच्या चौकशीत या तस्करीसंदर्भात अधिक माहिती उघड होण्याची शक्यता असून या तस्करांची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याआधी 21 सप्टेंबर रोजी न्हावाशेवा बंदरातून 1,725 कोटी रुपयांचा हेरॉईनचा साठा पकडण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली होती. आयात जेष्ठीमधाला हेरॉईनचे कोटींग करून ही तस्करी केली जात होती. दिल्ली पोलिसांनी गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीच्या आधारावर या तस्करीत गुंतलेल्या दोन अफगाणी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत या तस्करीचा खुलासा झाला होता. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे लखनऊमधूनही 1200 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडण्यात आले होते.

सध्या डीआरआय, नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी), सीबीआयसह इतर तपास संस्था अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जोरदार ऑपरेशन राबवीत आहेत. भारतात गेल्या काही महिन्यात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहेे. ‘टेरर फंडिंग’ या तस्करीचा संबंध वारंवार उघड झाला आहे. विशेषत: अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर या तस्करीत वाढ झाली असून तस्करीसाठी सागरी मार्गाचा वापर केला जात असल्याचे काही अहवालातून समोर येत आहे. देशात आयात केल्या जाणाऱ्या मालाच्या आडून होत असलेली तस्करीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

गेल्या वर्षी गुजरातच्या मुंद्रा बंदरात 21 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन पकडण्यात आले होते. त्यानंतर ही मोहीम अधिकच तीव्र करण्यात आली आहे.

leave a reply