पूर्व आशिया येत्या काळातील युक्रेन बनेल

- जपानच्या पंतप्रधानांचा इशारा

पूर्व आशियावॉशिंग्टन – ‘‘ईस्ट चायना सी’, ‘साऊथ चायना सी’ व तैवानबाबतच्या चीनच्या आक्रमक कारवाया पाहता पूर्व आशियातील सुरक्षाविषयक स्थिती ढासळत आहे. उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र चाचण्या इथल्या तणावात भर टाकत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर पूर्व आशिया येत्या काळातील युक्रेन बनेल’, असा इशारा जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी दिला. रशिया-युक्रेन युद्धाचे उदाहरण समोर ठेवून चीन तैवानवर हल्ला चढविल, असा संदेश जपानच्या पंतप्रधानांनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या अखेरीस दिला.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चिनी नौदलाच्या हालचाली इथल्या देशांसह या क्षेत्राशी हितसंबंध जोडलेल्या फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसाठी देखील चिंतेचा विषय ठरत आहेत. गेल्या महिन्याभरात चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने जपानच्या ओकिनावा बेटाच्या हद्दीजवळून प्रवास केला. तर चीनच्या लढाऊ विमानांनी साऊथ चायना सीच्या हवाई क्षेत्रात अमेरिकेच्या टेहळणी विमानापासून अवघ्या सात मीटर अंतरावरुन धोकादायकरित्या उड्डाण केले होते. यावर अमेरिकेने संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर चीनच्या लढाऊ व बॉम्बर विमानांसह विनाशिकांनी तैवानच्या हवाई व सागरी क्षेत्रातील घुसखोरी सुरू ठेवली आहे.

अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून जी7 सदस्य देशांच्या दौऱ्यावर असलेले जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी चीनविरोधात सहाय्य मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत किशिदा यांनी चीन तसेच उत्तर कोरियाच्या आक्रमकतेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना जपानच्या पंतप्रधानांनी युक्रेनमधील परिस्थितीचा हवाला देऊन पूर्व आशियातील परिस्थिती देखील त्याच मार्गावर असल्याचा इशारा किशिदा यांनी दिला. पूर्व युरोप आणि पूर्व आशियातील तणाव वेगळा नसल्याचे जपानचे पंतप्रधान म्हणाले.

‘‘एकतर्फी कारवाईद्वारे आमच्या शेजारची यथास्थिती बदलण्यासाठी गंभीर हालचाली सुरू आहेत. ‘ईस्ट चायना सी’, ‘साऊथ चायना सी’मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बळावर बदल केले जात आहेत. तर उत्तर कोरियाच्या आण्विक व क्षेपणास्त्र हालचाली येथील तणावात भर टाकत आहेत’’, अशा शब्दात किशिदा यांनी पाश्चिमात्य देशांचे या समस्याकडे लक्ष वेधले. तर जपानच्या शेजारचा उल्लेख करून पंतप्रधान किशिदा यांनी तैवानबाबतच्या चीनच्या हालचाली जपानच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सुचविले.

याआधीही जपानने चीनच्या तैवानविरोधातील हालचालींवर आक्षेप घेतला होता. चीन तैवानवर हल्ल्याच्या तयारीत असून अमेरिकेने तैवानच्या सुरक्षेसाठी वेगाने पावले उचलावी, असे आवाहन जपानने केले होते.

हिंदी

leave a reply