इराणमधील धार्मिक स्थळावरील दहशतवादी हल्ल्यामागे शत्रूंचे कारस्थान

इराणच्या नेत्यांचा गंभीर आरोप

Ebrahim-Raisiतेहरान – बुधवारी इराणच्या शिराझ शहरातील धार्मिक स्थळावर गोळीबार करून अज्ञात मारेकऱ्यांनी 15 जणांचा बळी घेतला. यामध्ये महिला व दोन मुलांचा बळी गेला आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे इराणच्या राजवटीने म्हटले आहे. इराणचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर मिळेल, असे जाहीर केले आहे. त्याचवेळी सध्या इराणमध्ये सुरू असलेल्या हिजाबसक्तीविरोधातील आंदोलनाशी या दहशतवादी हल्ल्याचा संबंध असल्याचा ठपका आयातुल्लाह खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ठेवला आहे.

फार मोठे धार्मिक महत्त्व असलेल्या या धार्मिक स्थळावर झालेला दहशतवादी हल्ला म्हणजे इराणच्या शत्रूंचे कारस्थान असल्याचा दावा आयातुल्लाह खामेनी यांनी केला. अशा युद्धखोर शत्रू व त्याला साथ देणाऱ्या विश्वासघातक्यांचा बिमोड करणे हे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य ठरते. सुरक्षा यंत्रणेपासून ते न्यायविभागापर्यंत तसेच माध्यमांमधील प्रत्येकाने इराणच्या या शत्रूविरोधात एकजूट करायला हवी, असे आवाहन खामेनी यांनी केले आहे. तर इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी इराणमध्ये निदर्शने करणाऱ्यांमुळेच शिराझ शहरात हा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा केला. कारण इराणच्या या शत्रूंना देशात अराजक माजवायचे आहे, दंगली घडवायच्या आहेत आणि त्यासाठीचे हे सारे सुरू असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी केला.

Iran attackमात्र इराणमध्ये सध्या सुरू असलेली हिजाबसक्तीच्या विरोधातील निदर्शने आणि शिराझ शहरात झालेला दहशतवादी हल्ला, यांचा संबंध जोडणारे पुरावे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेले नाहीत. पाश्चिमात्य माध्यमांनी यावर बोट ठेवले आहे. या दहशतवादी हल्ल्याचा वापर करून निदर्शकांच्या विरोधात अधिक कठोर कारवाई करण्यासाठी इराणची राजवट पावले उचणार असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला आहे. महसा अमिनी या 22 वर्षाच्या तरुणीला हिजाबसक्तीच्या विरोधात स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जीव गमवावा लागला होता. त्याचे तीव्र पडसाद इराणमध्ये उमटले व सप्टेंबर महिन्यापासून इराणमध्ये तीव्र निदर्शने सुरू झाली होती. सुरूवातीला महिलांच्या अधिकारांसाठी पुकारण्यात आलेल्या या निदर्शनांना काही काळाने इराणच्या राजवटीविरोधातील निदर्शनांचे स्वरूप आले.

ही निदर्शने मोडून काढण्यासाठी इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कठोर कारवाईमध्ये आत्तापर्यंत दोनशेहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. तसेच इराणच्या यंत्रणांनी धरपकड केलेल्यांमध्ये दहा हजाराहून अधिकजणांचा समावेश आहे. इराणच्या शाळा आणि विद्यापीठांमधून इराणच्या राजवटीचा निषेध करणारे पुढे येत असून शिक्षकवर्गाचाही या निदर्शनांना पाठिंबा असल्याचे दिसत आहे. कामगार, मजूर, व्यापारी वर्ग देखील या निदर्शनांमध्ये सहभागी झाला आहे. पण या निदर्शनांमागे अमेरिका व इस्रायल या इराणच्या शत्रूदेशांचे कारस्थान असल्याचा आरोप इराणची राजवट करीत आहे. तसेच काहीही झाले तरी इराणच्या राजवटीला या निदर्शनांमुळे धक्का बसणार नाही, असा विश्वास इराणचे नेते व्यक्त करीत आहेत.

असे असले तरी बुधवारी शिराझ शहरात झालेल्या हल्ल्यामुळे इराणच्या सुरक्षा यंत्रणांवरील ताण अधिकच वाढल्याचे दावे काही वृत्तसंस्थांनी केले. एकाच वेळी निदर्शने आणि दहशतवादी हल्ले यांना तोंड देण्याचे काम इराणच्या सुरक्षा यंत्रणांना करावे लागणार असून यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढेल, असे या वृत्तसंस्थांचे म्हणणे आहे. मात्र इराणमध्ये राजकीयदृष्ट्या सर्वाधिक प्रभावशाली असलेले धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी आणि राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी शिराझ शहरातील दहशतवादी हल्ल्याचा इराणमधील निदर्शनांशी संबंध जोडून आणखी एक वाद सुरू केला आहे. याद्वारे आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करणारे सारेजण परकीय कारस्थानाचा भाग असल्याचा आरोप करून खामेनी व राष्ट्राध्यक्ष रईसी निदर्शकांवर दडपण टाकत असल्याचे दिसत आहे.

leave a reply