युरोपिय देशांना अमेरिकेचा प्रभाव नसलेल्या नाटोची आवश्यकता

- हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन

अमेरिकेचा प्रभावबुडापेस्ट – युरोपिय देशांना अमेरिकेचा प्रभाव नसलेल्या नाटोवी आवश्यकता आहे, असे हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी बजावले. एका स्विस मासिकाला दिलेल्या मुलाखतीत ऑर्बन यांनी हे वक्तव्य केले. युरोप जिंकू शकणार नाही अशा लढायांमध्ये अमेरिका त्यांना खेचत असल्याचा आरोपही ऑर्बन यांनी यावेळी केला.

‘अमेरिकेला आपला प्रभाव अधिकाधिक वाढवत न्यायचा आहे. या उद्देशांमुळेच सध्या पाश्चिमात्य देश व रशियामध्ये तणाव निर्माण झाला आहे. सध्या नाटोत अमेरिकेचा शब्द हा निर्णायक मानला जातो. युरोपिय देश अमेरिकेच्याच निर्णयांना मान डोलावतात’, अशा शब्दात ऑर्बन यांनी नाटो अमेरिकन गट बनल्याची जाणीव करून दिली.

अमेरिकेचा प्रभावयापासून युरोपला मुक्त व्हायचे असेल तर युरोपला स्वतंत्र लष्करी आघाडीची आवश्यकता आहे. युरोपिय देशांनी अमेरिकेचा प्रभाव नसलेला लष्करी गट उभारण्याची गरज आहे, असा दावा हंगेरीच्या पंतप्रधानांनी केला. ‘युरोपियन नाटो हे त्याचे उत्तर असू शकते’, असेही ऑर्बन पुढे म्हणाले. नाटोने जॉर्जिआ व युक्रेनच्या दिशेने उचललेली पावेल ही रशियासाठी चिंतेची बाब असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आर्थिक तरतुदींच्या मुद्यावरून नाटोतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. तर दुसऱ्या बाजूला युरोपातील आघाडीचे देश असणाऱ्या जर्मनी व फ्रान्सने युरोपचे स्वतंत्र लष्कर स्थापन करण्याचे संकेत दिले होते. या प्रस्तावाला ब्रिटनने विरोध केला होता. मात्र फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते.

leave a reply