‘बिग टेक’च्या ‘कपाती’मुळे खळबळ

Corporate-Layoffsवॉशिंग्टन – कोरोनाची साथ, महागाईचा भडका व जागतिक मंदीचे संकट या पार्श्वभूमीवर जगभरातील आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलनेही यासंदर्भातील धोरणाचे संकेत देताना कर्मचाऱ्यांना उघड इशारा दिला. पुढील तिमाहिचा आर्थिक ताळेबंद खराब असल्यास कारणे शोधण्याची तसदी घेऊ नका, कारण तुमचे रक्त रस्त्यांवर सांडणार आहे, अशा शब्दात मोठ्या कपातीचे भाकित वर्तविले आहे. गुगलने संभाव्य कर्मचारीकपातीचे संकेत दिले आहेत. जगभरात ही प्रक्रिया आधीच सुरू झाली असून ॲमेझॉन, ॲपल, वॉलमार्ट, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, टेसला, अलिबाबा यासारख्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एकट्या ॲमेझॉनने गेल्या सहा महिन्यात तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले असून अलिबाबा या कंपनीने १० हजार जणांना कमी केले आहे.

दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाच्या साथीच्या काळात जगातील अनेक अर्थव्यवस्थांमध्ये मंदीचे वातावरण तयार झाले होते. २०२१ सालाच्या मध्यानंतर हे वातावरण निवळून जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र जागतिक पातळीवर पुरवठा साखळीत उद्भवलेल्या अडचणी, कोरोनाचे नवे उद्रेक, रशिया-युक्रेन युद्ध, मंकीपॉक्सची साथ व महागाईचा भडका यामुळे अर्थव्यवस्थेला पुन्हा धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह जगातील बहुतांश आघाडीच्या वित्तसंस्थांनी येत्या सहा महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे संकट येऊ शकते, असे भाकित वर्तविले आहे. याचे पडसाद उद्योग क्षेत्र तसेच कॉर्पोरेट जगतातही उमटण्यास सुरुवात झाली असून बहुतांश कंपन्यांनी नवी गुंतवणूक व नोकऱ्यांच्या संधी याबाबत हात आखडता घेण्यास सुरुवात केली आहे.

layoff_strategiesयात माहिती तंत्रज्ञान, रिटेल सेल्स, ई-कॉमर्स, वित्त, मनोरंजन तसेच रिअल इस्टेट क्षेत्रातील बड्या कंपन्यांचा समावेश आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या ‘ॲमेझॉन’ने गेल्या सहा महिन्यात तब्बल एक लाख जणांना नोकरीवरून काढून टाकले आहे. कोरोना काळात व त्यानंतर केलेली अतिरिक्त भरती कमी करून पुनर्रचना करीत असल्याचे कारण कंपनीने पुढे केले आहे. चीनमधील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ‘अलिबाबा’ या कंपनीनेही १० हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘बिग टेक’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या कंपन्यांपैकी ‘मायक्रोसॉफ्ट’ या कंपनीने सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. ‘ॲपल’ व ‘ट्विटर’ या कंपन्यांनी प्रत्येकी १०० कर्मचाऱ्यांची कपात केली असून फेसबुकने नवी भरती स्थगित केल्याची माहिती दिली आहे. गुगलनेही त्याच दिशेने तयारी सुरू केली असून कंपनीच्या ‘क्लाऊड सर्व्हिस’ विभागातील कर्मचाऱ्यांना हकालपट्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी, काही विभागांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याचे सांगून याला दुजोरा दिला. रिटेल सेल्स क्षेत्रातील वॉलमार्ट, टेस्को तर वाहनक्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘फोर्ड’नेही कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे. इलेक्कि वाहनांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘टेसला’नेही जवळपास २०० कर्मचारी कमी केले असून पुढील तीन महिन्यांमध्ये कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के जणांना काढण्याचे संकेत कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी दिले आहेत. आघाडीचे स्टार्टअप म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘पेलोटोन’ने अडीच हजारांहून अधिक तर ‘रॉबिनहूड’ने ३००हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून दूर केले आहे. ‘स्टार्टअप’ क्षेत्रातील जवळपास ७० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड कोसळली आहे.

भारतातही याचे परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या सहा महिन्यात भारतातील आघाडीच्या ३४ स्टार्टअप कंपन्यांनी ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली. या कंपन्यांमध्ये ‘ओला’, ‘कार्स२४’, ‘वेदांतू’, ‘मीशो’, ‘अनअकॅडमी’ ‘फार्म इझी’ यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. ‘एज्युटेक’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला असून या क्षेत्रातील ११ कंपन्यांनी चार हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे समोर आले आहे. गुंतवणुकीचा आटलेला ओघ व संभाव्य मंदी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. या सर्व पार्श्वभूमीवर गुगलच्या नेतृत्त्वाकडून देण्यात आलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply