देशाची निर्यात 760 अब्ज डॉलर्सवर गेली

नवी दिल्ली – स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतानाच, भारताची निर्यात 750 अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी यासाठी देशाचे अभिनंदन केले आहे. या वित्तीय वर्षातील निर्यात तब्बल 760 अब्ज डॉलर्सवर गेल्याची माहिती देऊन पियूष गोयल यांनी पुढच्या काळात देश तब्बल दोन लाख कोटी डॉलर्सच्या (दोन ट्रिलियन डॉलर्स) निर्यातीचे ध्येय गाठेल, असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाच्या निर्यातीतल झालेल्या वाढीवर समाधान व्यक्त करून आत्मनिर्भरतेची मोहीम यामुळे अधिक प्रखर होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

देशाची निर्यात 760 अब्ज डॉलर्सवर गेली‘असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया-एएसएसओसीएचएएम’च्या (असोचॅम) वार्षिक बैठकीत बोलताना वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी देशाची व्यापारी व सेवा क्षेत्रातील निर्यात तब्बल 760 अब्ज डॉलर्सवर गेल्याची माहिती दिली. गेल्या वित्तीय वर्षाच्या तुलनेत यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकारने रस्ते, विमानतळ, बंदरांचा विकास हाती घेतला असून अर्थकारणाला चालना देणारे निर्णय घेतले आहेत. यामुळे निर्यातीत प्रचंड प्रमाणात वाढ दिसत असल्याचा दावा वाणिज्यमंत्र्यांनी केला. तसेच या निर्यातवाढीसाठी अथकपणे प्रयत्न करणाऱ्या भारतीयांची केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांनी प्रशंसा केली.

निर्यातवाढीचा वेग असाच कायम राहिला तर येत्या काही वर्षात तब्बल दोन ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीचे ध्येय देश गाठू शकतो, असे पियूष गोयल यांनी म्हटले आहे. येत्या चार ते पाच वर्षात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही यावेळी पियूष गोयल यांनी व्यक्त केला. जागतिक व्यापार 32 ट्रिलियन डॉलर्स इतका असून यातील भारतासारख्या मोठ्या देशाचा हिस्सा अजूनही अत्यल्प प्रमाणात आहे. यामुळे भारताला जागतिक व्यापारात फार मोठी संधी असल्याचे वाणिज्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिले.

आपल्याच बाजारपेठेचा वापर करून सशक्तपणे उभे राहणाऱ्या अर्थव्यवस्थेचे भारत सोडून दुसरे उदाहरण जगात सापडणे अवघड असल्याचेही यावेळी वाणिज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भारतामध्ये गरीबीतून बाहेर पडणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी असून या आघाडीवर जग भारताकडे नेता म्हणून पाहत असल्याचा दावा देखील वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी यावेळी केला.

 

leave a reply