परराष्ट्रमंत्री जयशंकर न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाच्या भेटीवर

ऑकलंड – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी निघाले आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांच्याशी परराष्ट्रमंत्री जयशंकर चर्चा करतील. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियाला भेट देणार आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात फार मोठ्या उलथापालथी होत असताना, परराष्ट्रमंत्र्यांचा हा सात दिवसांचा दौरा राजकीय व सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ऑस्ट्रेलियाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादी कारवायांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारून चीनविरोधात भारताबरोबर सर्वच पातळ्यांवरील सहकार्य वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या दौऱ्याचे महत्त्व अधिकच वाढल्याचे दिसते.

s jaishankarपरराष्ट्रमंत्री जयशंकर न्यूझीलंडच्या आकलंड येथे उतरले असून इथे त्यांनी भारतीय वंशाच्या न्यूझीलंडच्या मंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. तसेच न्यूझीलंडच्या संसद सदस्य आणि उद्योगक्षेत्रातील मान्यवराशीही परराष्ट्रमंत्री जयशंकर चर्चा करतील. यानंतर जयशंकर यांचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होईल. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आणि सिडनी या शहरांना परराष्ट्रमंत्री जयशंकर भेट देणार आहेत.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा ठरतो. याच्या आधी क्वाडच्या बैठकीसाठी फेब्रुवारी महिन्यात जयशंकर ऑस्ट्रेलियाच्या भेटीवर होते. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांच्याशी जयशंकर चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील सहकार्यासंदर्भात होणाऱ्या या चर्चेत पुढच्या काळातील सहकार्याचा आराखडा मांडला जाईल, असे मानले जाते.

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री असलेले रिचर्ड मार्लेस यांच्याशीही परराष्ट्रमंत्री जयशंकर चर्चा करणार आहेत. ऑस्ट्रेलियातील ख्यातनाम अभ्यासगट लोव्ही इन्स्टीट्यूटमध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर व्याख्यान देणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच भारत व ऑस्ट्रेलियामध्ये मुक्त व्यापारी करार केला होता. यामुळे दोन्ही देशामधील व्यापार प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तसे संकेत देखील मिळू लागले आहेत. विशेषतः चीनबरोबरील ऑस्ट्रेलियाचे संबंध विकोपाला गेलेले असताना, ऑस्ट्रेलियाचे भारताबरोबरील हे व्यापारी सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. तैवान तसेच कोरोनाच्या साथीसंदर्भात ऑस्ट्रेलियाने चीनच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील छोट्या बेटदेशांना आपल्या प्रभावाखाली आणून त्यांचा सामरिक वापर करण्याच्या चीनच्या धोरणाविरोधात ऑस्ट्रेलियाने कणखर भूमिका स्वीकारलेली आहे.

यासाठी ऑस्ट्रेलियाला धडा शिकविण्याकरीता चीनने ऑस्ट्रेलियाच्या उत्पादनांवर निर्बंध लादले होते. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियाला आपल्या लष्करी सामर्थ्याच्या दहशतीखाली ठेवण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाने चीनचा हा दबाव झुगारून दिला असून अमेरिका व ब्रिटनसारख्या देशांबरोबरील सामरिक सहकार्य वाढविले आहे. इतकेच नाही तर भारताबरोबरील आपल्या संबंधांना विशेष महत्त्व देऊन ऑस्ट्रेलियाने चीनला अस्वस्थ करून सोडले आहे. या पार्श्वभूमीवर, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा दोन्ही देशांच्या व्यापारी, राजकीय तसेच सामरिक सहकार्याच्या दृष्टीने लक्षवेधी ठरतो आहे.

leave a reply