जम्मू-काश्मीरमध्ये पहिला ‘हायब्रिड’ दहशतवादी ठार

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील एका व्यापार्‍याला लक्ष्य करण्याच्या तयारीत असलेल्या एका ‘हायब्रिड’ दहशतवाद्याला गुरुवारी सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले. जम्मू-काश्मीरमध्ये दोन स्थलांतरील मजूरांच्या हत्येतही हा दहशतवादी सहभागी होता, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. हा जम्मू-काश्मीरमध्ये ठार करण्यात आलेला पहिला हायब्रिड दहशतवादी असल्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी पुंछमध्ये सुरू असलेले ऑपरेशन १८ दिवस उलटले तरी सुरू आहे. गुरुवारी दहशतवाद्यांना सहाय्य केल्याप्रकरणे तीन स्थानिक नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पहिला ‘हायब्रिड’ दहशतवादी ठारजम्मू-काश्मीरच्या बरामुल्ला जिल्ह्यातील चेरदई भागात लष्कर आणि पोलीसांची संयुक्त गस्त सुरू असताना जवानांना पाहून एका दहशतवाद्याने अचानक गोळीबार सुरू केला. यानंतर उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याची ओळख जावेद आह वाणी अशी पटली आहे आणि तो मुळचा जम्मू-काश्मीरच्या कुलगामचा रहिवाशी आहे. हा ‘हायब्रिड’ प्रकारातील दहशतवादी होता, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरिक्षक विजय कुमार यांनी दिली. सुरक्षादल आणि दहशतवाद्याचा सामना झाला, त्यावेळी हा दहशतवादी एका दुकानदाराला लक्ष्य करण्यासाठी निघाला होता, असेही पोलीस महानिरिक्षक कुमार यांनी सांगितले. पोलिसांनी ठार झालेल्या दहशतवाद्याच्या जवळून एक ग्रेनेड, एक पिस्तूल हस्तगत केली आहे.

ठार झालेल्या जावेद वाणीने याआधी काश्मीर खोर्‍यात दोन स्थलांतरीत मजूरांच्या हत्येसाठी लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याची मदत केली होती. २० ऑक्टोबरला शोपियानमध्ये सुरक्षादलांनी लश्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. यातील गुलजार नावाच्या दहशतवाद्याला जावेद वाणीने मदत पुरविली होती. गुलजार याने निष्पाप मजूरांवर हल्ले केले होते, अशी माहितीही पोलीस महानिरिक्षक कुमार यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमध्ये ‘हायब्रिड’ दहशतवादाच्या रुपात मोठे आव्हान उभे राहिल्याचे इशारे याआधी सुरक्षा अधिकारी व तज्ज्ञांनी दिले होते. सामान्य जीवन जगत असले, तरी कधीही दहशतवादी हल्ले करू शकतील इतके कट्टरपंथी बनलेल्या दहशतवाद्यांना हायब्रिड दहशतवादी म्हटले जाते. असे दहशतवादी कोणत्याही संघटनेशी जोडलेले नसले, तरी हस्तकांकडून व चिथावणीखोरांकडून सूचना मिळताच दहशतवादी हल्ले करू शकतात आणि असे हल्ले केल्यावर पुन्हा आपल्या सामान्य जीवन जगू लागतात. अशा दहशतवाद्यांची कुठेही नोंद नसल्याने त्याचा माग काढणे मोठे आव्हान असते.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यात कोणत्याही संरक्षणाशिवाय वावरणारे पोलीस, राजकीय नेते, व्यापारी व मजूरांवर झालेले हल्ल्यात दहशतवाद्यांना अशाच हायब्रिड दहशतवाद्यांनी सहाय्य केल्याचे लक्षात येत आहे. तसेच काही हल्ले थेट या हायब्रिड दहशतवाद्यांनी घडविल्याचाही संशय व्यक्त केला जातो. या पार्श्‍वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांवर जोरदार करावाई सुरू आहे. सुरक्षादलांबरोबर एनआयएसारख्या संघटना दहशतवाद्यांना सहाय्य पुरविणार्‍यांवर कारवाई करीत आहेत. एनआयएने गेल्या काही दिवसात टाकलेल्या छाप्यात दहशतवाद्यांना मदत पुरविणार्‍या ९०० पेक्षा अधिक ओव्हर ग्राऊंड वर्कर्सना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसच सध्या पुंछमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशनमध्येही दहशतवाद्यांना सहाय्य करणार्‍या २० जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यातील तिघांना गुरुवारी अटक करण्यात आली.

leave a reply