महाराष्ट्रातील ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला

- यंत्रणासमोरील चिंता वाढल्या

नवी दिल्ली/मुंबई – डेल्टापेक्षा कितीतरी वेगाने पसरणारा आणि सार्‍या जगाला पुन्हा एका चिंतेत टाकणार्‍या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटची लागण झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रातही ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्रातील पहिला रुग्ण हा कल्याण-डोेंबिवली महापालिका क्षेत्रात आढळला असून यामुळे यंत्रणांसमोरील चिंता वाढल्या आहेत.

महाराष्ट्रातील ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला - यंत्रणासमोरील चिंता वाढल्यापाचच दिवसांपूर्वी कल्याण-डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून परतलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी आली होती. मात्र त्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंगबाबतचा अहवाल आला नव्हता. त्यामुळे या रुग्णांना कोणत्या व्हेरिअंटची बाधा झाली नव्हती. आता त्यांचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल प्राप्त झाला असून यातील एका अभियंत्या तरुणाला ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ‘ओमिक्रॉन’ हा पहिला रुग्ण असून दक्षिण आफ्रिकेतून दुबईमार्गे दिल्लीत आला होता.

२३ नोव्हेंबर रोजी दिल्ली विमानतळावर उतरून दुसर्‍या दिवशी २४ तारखेला त्याने मुंबईसाठीचे विमान पकडले होते. २४ तारखेला कल्याण-डोंबिवलीत दाखल झालेल्या या तरुणांची ‘ओमिक्रॉन’बाबत बातम्या येऊ लागल्यावर कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये हा तरुण पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते.

अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार या रुग्णाने एकही लस घेतलेली नाही. मात्र त्याला दिसत असलेली कोरोना लक्षणे सौम्य आहेत. तसेच त्याचे सहप्रवासी असलेल्या १२ जणांपर्यंत पोहोचून त्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या. या बाराही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर याच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांच्या चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. तसेच या रुग्णाच्या संपर्कात इतर कोणी आले आहे का याचाही शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉनसचे पहिले प्रकरण आहे. त्यामुळे चिंता वाढल्या आहेत. पुण्यात आफ्रिकन देश झांबियामधून आलेल्या एका ६० वर्षिय व्यक्तीलाही केरोना झाल्याचे चार दिवसांपूर्वी उघड झाले होते. जिनोम अहवालात तो डेल्टा व्हेरिअंटने ग्रासित आढळला आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतच परदेशातून आलेले आणखी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. पण यातील कोणीही जोखिम असलेल्या देशातून आलेले नाहीत, असे अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे. तसेच या सहा जणांची प्रकृत स्थिर असल्याची माहिती अधिकार्‍याने दिली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या महामुंबई क्षेत्रातील परदेशातून आलेल्या ३० हून अधिक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील काही जणांचे जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल अजून यायचे असल्याच्या बातम्या आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

leave a reply