गडचिरोलीतील चकमकीत पाच माओवादी ठार 

गडचिरोली – गडचिरोलीच्या धनोरा भागात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत पाच कट्टर माओवाद्यांना ठार मारण्यात यश मिळाले आहे. यामध्ये तीन महिला माओवाद्यांचा समावेश आहे. या भागात माओवाद्यांविरोधातील या वर्षातील ही मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.

गडचिरोली

धनोरामधील ग्यारापती हद्दीतील कोसमी-किसनेली जंगल परिसरात पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाच्या जवानांनी माओवाद्यांविरोधाम मोहीम हाती घेतली होती. यावेळी माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. पोलिसांनी घेरल्याचे लक्षात आल्यावर माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरु केला. यानंतर सी ६० जवानांनी माओवाद्यांच्या हल्ल्यास सडेतोड प्रत्युत्तर दिले.

सी-६० पथकातील जवानांनी दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरापुढे आपला टिकाव लागणार नसल्याचे लक्षात येताच माओवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. चकमकीनंतर घटनास्थळावरून पाच माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. जवानांनी माओवाद्यांचा लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. चकमकीनंतर या भागात व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

माओवाद्यांविरोधात गडचिरोलीत या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे.१५ सप्टेंबर रोजी माओवादी आणि सुरक्षादलांच्या जवानांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांना ठार मारण्यात आले होते. गडचिरोलीसह तेलंगणांच्या मुलुगु जिल्ह्यात रविवारी पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले.

देशातून माओवाद्यांच्या संपूर्ण उच्चाटनासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. माओवाद्यांचा प्रभाव अजून कायम असलेल्या भागांमध्ये मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. माओवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आल्याने माओवादी बिथरले असून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धड्पडत आहेत.

leave a reply