देशातील सात राज्यांना अतिवृष्टीसह पुराचा तडाखा

नवी दिल्ली – कोरोनाची साथ वाढत असतानाच देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीसह पुराचे संकट उभे राहिले आहे. गुजरात, बिहार, मध्य प्रदेशसह देशातील सात राज्यांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यांमधील स्थिती गंभीर बनली असून अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. उत्तर प्रदेशामधील शेकडो गावांना पुराने वेढले असून बिहारच्या १६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. गुजरातच्या १०० पेक्षा अधिक धरणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानमधील सुमारे ५० टक्के भाग पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात येते. तर उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्याने १०० रस्ते बंद करण्यात आले आहेत.

अतिवृष्टी

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बिहारमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. १६ जिल्ह्यातील १३० तालुक्यांना पुराचा फटका बसला असून सुमारे ८४ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत २७ नागरिकांचा मृ्त्यू झाला आहे. गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. गंगा नदीसह बागमती, बूढी, गंडक, खिरोईसह अन्य नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडलल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. प्रशासनाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्शित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र पूरामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.

उत्तर प्रदेशमधील परिस्थिती वेगळी नाही. राज्यातील तीन नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामळे १६ जिल्ह्यांमधील १०००हून अधिक गावांना पुराचा फटका बसला आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या खाडीत वरच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामानखात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. राजस्थानामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बारन आणि झालावाड जिल्ह्यात पार्वती आणि कालीसिंध नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्याच्या जवळपास अर्ध्या भागात पाण्याचे साम्राज्य असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अतिवृष्टी

गुजरातच्या १०० पेक्षा अधिक धरणांसाठी हाय अलर्ट देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे ४४ नद्या आणि ४१ तलाव ओसंडून वाहत आहेत. पश्चिम बंगालमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळत असून परिस्थिती गंभीर बनली आहे. उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्याने चार राष्ट्रीय महामार्गासह १०० रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. ‘एनएच ५८’ गेल्या २० दिवसांपासून बंद असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. पुराचा धोका ओळखून केंद्र सरकार व राज्यांनी परस्पर समन्वय राखून आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. हवामान खात्याने राजस्‍थान, सौराष्‍ट्र व कच्‍छमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.

leave a reply