भारताच्या दौऱ्यात फार मोठे यश मिळाल्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावा

इस्लामाबाद – भारताच्या दौऱ्यात आपल्याला फार मोठे यश मिळाल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी ठोकला आहे. सारे इस्लामधर्मिय दहशतवादी आहेत, हा समज आपण भारताच्या दौऱ्यात खोडून काढल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे. पण प्रत्यक्षात भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी किंवा अन्य कुणी असे बेताल दावे केलेच नव्हते. त्यामुळे पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करून न केलेल्या पराक्रमाचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न बिलावल भुत्तो झरदारी करीत असल्याचे समोर येत आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी व विश्लेषकांनीही परराष्ट्रमंत्री भुत्तो यांचा भारत दौरा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे.

भारताच्या दौऱ्यात फार मोठे यश मिळाल्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा दावादहशतवादाचे पुरस्कर्ते आणि त्याचा बचाव करणारे प्रवक्ते या नात्याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी एससीओच्या या बैठकीत काम करण्याचा प्रयत्न केला. पण सदर बैठकीत तिथल्या तिथेच त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले होते. पाकिस्तानची विश्वासार्हता या देशाच्या परकीय गंगाजळीपेक्षाही खाली घसरल्याचा मर्मभेदी टोला भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी लगावला. त्याची दखल पाकिस्तानच्या माध्यमांनाही घ्यावी लागल्याचे दिसते आहे. पाकिस्तानी माध्यमांनी तर जयशंकर यांनी आपल्या देशाचे वाभाडे काढल्याची खंत व्यक्त केली. तसेच परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचा दावाही पाकिस्तानी माध्यमे व विश्लेषकांनी केला आहे.

अतिशय अनुभवी व प्रभावशाली राजनैतिक अधिकारी म्हणून काम केलेल्या जयशंकर यांच्यासमोर बिलावल भुत्तो तोकडे पडले. अशारितीने पाकिस्तानचा अपमान करण्यापेक्षा त्यांनी व्हर्च्युअल माध्यमातून एससीओच्या बैठकीला संबोधित केले असते, तर ते अधिक सयुक्तिक ठरले असते, असे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे. तर एका पाकिस्तानी पत्रकाराने बिलावल भुत्तो झरदारी यांचा हा दौरा आपली राजकीय कारकिर्द उजळविण्यासाठीच होता, अशी टीका केली आहे.

भुत्तो यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असून पाकिस्तानचे पंतप्रधानपद हे त्यांचे लक्ष आहे. त्यासाठी आपण भारतात जाऊन आक्रमकतेने पाकिस्तानची बाजू मांडली, हे बिलावल भुत्तो यांना दाखवायचे होते. त्यासाठीच त्यांनी एससीओच्या बैठकीचे निमित्त करून भारताचा दौरा केला, असा आरोप पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे.

हिंदी

 

leave a reply