भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या ‘आर्मी रिसर्च अँड रेफरल’ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला, असे सांगून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रणवदांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रणव मुखर्जी यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दु:खवटा जाहीर केला आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

गेल्या काही दिवसांपासून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आजारी होते. त्यांची ब्रेन सर्जरी झाली होती. तसेच त्यांना कोरोनाव्हायरसचे निदान झाले होते. अखेर सोमवारी सांयकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनावर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. ‘एका युगाचा अंत झाला. एका तपस्व्याप्रमाणे ते भारतमातेसाठी झटले. देशाने महान सुपूत्र गमावला आहे’, अशा शब्दात राष्ट्रपती कोविंद यांनी शोक व्यक्त केला. ‘भारतरत्न प्रणव मुखर्जी म्हणजे व्यासंगी व उत्तुंग असे राजकीय व्यक्तिमत्व होते’, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रणव मुखर्जी यांचा जन्म १९३५ साली झाला. एम.ए आणि एलएलबीपर्यंतचे शिक्षण झालेल्या प्रणव मुखर्जी यांनी १९६९ साली राजकारणात प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी मदत केली. प्रदीर्घ काळ राजकीय कारकीर्द निभावणारे नेते म्हणून प्रणव मुखर्जी यांची ओळख होती. सात वेळा संसद सदस्य बनलेल्या प्रणवदांनी केंद्रीय मंत्रीमंडळात अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी अत्यंत महत्त्वाची पदे भूषविली होती. २०१२ साली प्रणवदा भारताचे राष्ट्रपती बनले. २०१७ सालापर्यंत ते या सर्वोच्च पदावर होते. त्याआधी २००९ ते २०१२ सालापर्यंत ते केंद्रीय अर्थमंत्री होते. २०१९ साली प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

leave a reply