इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे चार जवान पाकिस्तान सीमेजवळ ठार

चार जवानझाहेदान – इराणच्या सिस्तान-बलोचिस्तान प्रांतात रिव्होल्युशनरी गार्ड्सचे चार जवान ठार झाले. पाकिस्तानच्या सीमेजवळ घडलेल्या या घटनेसाठी लुटारूंची टोळी जबाबदार असल्याचा आरोप इराणी वृत्तसंस्थेने केला. रिव्होल्युशनरी गार्ड्सने थेटपणे उल्लेख टाळला असला तरी, या हल्ल्यामागे बलोच बंडखोरांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. गेली कित्येक दशके इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील बलोच जनता स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करीत आहेत.

पाकिस्तानच्या सीमेला भिडलेल्या इराणच्या सिस्तान-बलोचिस्तान प्रांतातील गौनिक जिल्ह्यातील खाश शहरात रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या वाहनावर हल्ला झाला. येथील कारावांदेर मार्गावर या टोळीने केलेल्या हल्ल्यात लष्करी वाहनातील रिव्होल्युशनरी गार्ड्सचे चार जवान जागीच ठार झाले. यापैकी तीन जवान बलोच वंशाचे होते. यासंबंधीची अधिक माहिती नंतर प्रसिद्ध होईल, असे इराणच्या माध्यमांनी म्हटले आहे.

आपल्या जवानांवरील हल्ल्यामागे बलोच बंडखोर असल्याचा आरोप करण्याचे रिव्होल्युशनरी गार्ड्स किंवा इराणी माध्यामांनी टाळले. पण गेल्या कित्येक दशकांपासून स्वतंत्र बलोचिस्तानच्या मागणीसाठी इराणच्या राजवटीविरोधात लढा देणारे बलोच बंडखोर इराणी जवानांवरील या हल्ल्यासाठी जबाबदार असल्याचा दावा केला जातो. इराणच्या सुरक्षा यंत्रणा आणि बलोच बंडखोरांमध्ये संघर्ष अधूनमधून सुरू असतो.

अमली पदार्थ तसेच इंधनाच्या तस्करीत बलोच बंडखोरांचा सहभाग असल्याचा आरोप इराण करीत आहे. यामुळे इराणी लष्कर आणि बलोच बंडखोरांमध्ये संघर्ष सुरू असल्याचा दावा केला जातो. पण स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी दडपण्यासाठी इराणच्या लष्कराकडून बलोचांवर कारवाई केेली जात असल्याचा ठपका स्थानिक बलोच नेते करीत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून इराणच्या राजवटीने बलोचांची ओळख पुसण्यासाठी पद्धतशीरपणे कारवाई सुरू केल्याचे बोलले जाते. बलोचिस्तान प्रांताला छोट्या भागांमध्ये विभागणे, शालेय पाठ्यक्रमातून बलोची भाषेला वगळणे, मुलांना बलोची नावे देऊ नये म्हणून दबाव टाकणे, येथील ऐतिहासिक शहरांची बलोच नावे बदलणे आणि सरकारी दस्तावेज व पाठ्यक्रमातून बलोचिस्तानचा संदर्भ वगळणे, असे प्रकार सुरू केले आहेत.

यामुळे येथील बलोच जनतेतील इराणच्या राजवटीविरोधातील असंतोष वाढत असल्याचा दावा केला जातो. याचा परिणाम म्हणून खुझेस्तानमधील सुन्नीपंथिय अरब, कुर्दिस्तानमधील कुर्द यांनी पुकारलेल्या इराणच्या राजवटीविरोधातील निदर्शनांना बलोच गटांचेही समर्थन मिळत आहे.

leave a reply