संरक्षणाशी निगडित उद्योगाची पायाभरणी करण्याकरिता फ्रान्स भारताबरोबरील भागीदारीसाठी उत्सुक

- फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युअल लेनाईन

संरक्षणाशी निगडित

पणजी – भारतीय संरक्षणदलांना सर्वोत्तम तंत्रज्ञान कुठल्याही अडथळ्याखेरीज पुरविण्यासाठी फ्रान्स वचनबद्ध आहे. फ्रान्स केवळ ‘मेक इन इंडिया’ला सहाय्य करणार नाही, तर संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रे भारताबरोबर संयुक्तपणे विकसित करण्यासाठी व त्यांच्या उत्पादनासाठीही उत्सुक आहे. संरक्षणाशी निगडीत उद्योगासाठी आवश्यक असलेली औद्योगिक पार्श्वभूमी भारतात विकसित करण्यासाठी फ्रान्स भारताला सहाय्य करू शकेल, असे फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युअल लेनाईन यांनी म्हटले आहे.

गोव्यामध्ये भारत व फ्रान्सच्या नौदलाचा ‘वरुण’ युद्धसराव संपन्न झाला. या सरावात फ्रान्सची विमानवाहू युद्धनौका ‘चार्ल्स दी गॉल’ सहभागी झाली होती. या युद्धनौकेवरून माध्यमांशी संवाद साधताना फ्रान्सच्या राजदूतांनी आपल्या देशाची भारताबाबतची भूमिका मांडली. आत्मनिर्भर भारताची संकल्पना फ्रान्स अधिक चांगल्यारितीने समजून घेऊ शकतो. कारण भारताप्रमाणेच आपल्या स्वातंत्र्याला सर्वोच्च प्राधान्य देणारा देश असलेला फ्रान्स, आज भारत ज्या स्थितीतून चालला त्या स्थितीतून गेलेला आहे. म्हणूनच भारताला संरक्षणाशी निगडीत असलेल्या उद्योगांच्या पायाभरणीसाठी भागीदार म्हणून सहाय्य करण्यासाठी फ्रान्स उत्सुक असल्याचा दावा फ्रेंच राजदूतांनी केला.

संरक्षणाशी निगडितभारत आपल्या संरक्षणक्षेत्राशी निगडीत असलेल्या पुरवठा साखळीत वैविध्य आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी फ्रान्स हा उत्तम पर्याय ठरेल. भारत व फ्रान्सचे द्विपक्षीय संबंध भक्कम असून दोन्ही देश आपल्या सार्वभौमत्त्वाला सर्वोच्च प्राधान्य देतात. दोन्ही देशांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ठरतो. तसेच उभय देशांचा परस्परांवर दृढ विश्वास आहे. म्हणूनच भारताबरोबर संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रे संयुक्तरित्या विकसित करून त्यांचे संयुक्त उत्पादन करण्यासाठी फ्रान्स स्वारस्य दाखवित असल्याचे राजदूत इमॅन्युअल लेनाईन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भारताने फ्रान्सकडून रफायल लढाऊ विमानांची खरेदी केली असून पुढच्या काळात फ्रान्सला या विमानांचे नवे कंत्राट पुरविण्याची तयारीही भारताने केली आहे. याबरोबरच आपल्या नौदलाच्या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांसाठी भारताने फ्रान्सचे सहकार्य घेतले होते. तर दुसऱ्या बाजूला इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी भारत हा सर्वात महत्त्वाचा देश ठरतो, असा दावा फ्रान्सने केला होता. हिंदी महासागर क्षेत्रातील आपल्या बेटांच्या व या बेटांवर वास्तव्य करीत असलेल्या फ्रेंच नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारताबरोबरील संरक्षणविषयक भागीदारी विकसित करण्यासाठी फ्रान्स पुढाकार घेत आहे. चीनपासून इंडो-पॅसिफिक क्षेत्राला संभवणाऱ्या धोक्याच्या विरोधात फ्रान्सने कणखर भूमिका घेतली होती. तसेच या क्षेत्रात संपूर्ण सुरक्षा पुरविणारा देश म्हणून आपण भारताकडे पाहत असल्याचे फ्रान्सचे नेते व राजनैतिक अधिकारी सातत्याने सांगत आहेत.

फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनाईन यांनी केलेली विधाने ही बाब नव्याने अधोरेखित करीत आहेत.

leave a reply