शांततेची भाषा करणाऱ्या तुर्कीवर फ्रान्सचे टीकास्त्र

पॅरिस/अंंकारा – ‘तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याकडून गेले काही दिवस शांततेची भाषा ऐकायला मिळत आहे. मात्र अशी भाषा असणारी निरर्थक वक्तव्ये उपयोगाची नाहीत. तुर्कीने त्याप्रमाणे केलेली कृतीही दिसायला हवी’, अशा खरमरीत शब्दात फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-य्वेस ले द्रिआन यांनी तुर्कीला ठणकावले आहे. पुढील महिन्यात तुर्कीच्या मुद्यावर युरोपिय महासंघाची बैठक असून त्यात तुर्कीवर टाकण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर, तुर्की राष्ट्राध्यक्षांनी अचानक आपली भाषा सौम्य करीत तुर्की व युरोपमधील सहकार्याबाबत दावे करण्यास सुरुवात केली आहे.

‘लिबिया, इराक, भूमध्य सागरी क्षेत्र व नागोर्नो-कॅराबखमधील तुर्कीच्या हालचाली आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत. तुर्कीने आपल्या विस्तारवादी धोरणाला गती दिली असून आमच्यात प्रचंड मतभेद आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या महासंघाच्या बैठकीत तुर्कीच्या कारवायांवर विस्ताराने चर्चा झाली असून लवकरच तुर्कीवरील निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येईल’, असा इशारा फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-य्वेस ले द्रिआन यांनी दिला.

फ्रान्स व तुर्कीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या मुद्यांवर खटके उडत आहेत. मात्र यावर्षात दोन देशांमधील वाद चांगलेच चिघळले आहेत. युरोपात घुसणारे निर्वासित, कट्टरपंथिय, लिबिया, ग्रीस आणि आर्मेनिया-अझरबैजान युद्धाबाबत दोन्ही देशांनी परस्परविरोधी टोकाची भूमिका घेतली होती. तुर्की राष्ट्राध्यक्षांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यावर अवमानकारक शब्दात टीका करून त्यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचे उद्गार काढले होते. तुर्की राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करून फ्रान्सने तुर्कीतील आपल्या राजदूतांना माघारी बोलावले होते.

त्यानंतर दोन देशांमधील तणाव निवळण्याची कोणतीही चिन्हे नसून फ्रान्सने तुर्कीला युरोपिय महासंघाच्या सदस्यत्त्वापासून कायमस्वरुपी दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ग्रीस तसेच सायप्रसमधील या सदस्य देशांविरोधात तुर्कीकडून सुरू असलेल्या कारवायांचा मुद्दा फ्रान्सने अत्यंत आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी इतर युरोपिय देशांशी सातत्याने चर्चाही करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तुर्कीची युरोपिय महासंघाच्या ‘कस्टम्स युनियन’मधून हकालपट्टी करावी, अशी उघड मागणीही केली होती.

या पार्श्‍वभूमीवर पुढील महिन्यात होणारी युरोपिय महासंघाची बैठक तुर्कीबाबत निर्णायक ठरेल, असे संकेत मिळत आहेत. याची जाणीव झालेल्या तुर्की राष्ट्राध्यक्षांनी अचानक आपला सूर सौम्य केल्याचे गेल्या दोन दिवसात दिसून आले. तुर्कीला युरोपिय महासंघ व सदस्य देशांबरोबर मैत्रीपूर्ण सहकार्य हवे आहे, असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी म्हटले आहे. तुर्कीला महासंघाचे सदस्यत्व हवे असून त्यासाठी महासंघाने वेगाने पावले टाकावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तुर्की राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्याचा फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी कडक शब्दात समाचार घेतला. एर्दोगन यांची वक्तव्ये पोकळ असल्याचा आरोप करून, परराष्ट्रमंत्री ले द्रिआन यांनी तुर्कीच्या लिबिया, भूमध्य सागरी क्षेत्र व ‘नागोर्नो-कॅराबख’मधील हस्तक्षेपाकडे लक्ष वेधले. सहकार्याची भाषा करणारा तुर्की याबाबत काय हालचाली करतो याकडे युरोपचे लक्ष आहे, असे फ्रेंच परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले.

leave a reply