फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांकडून भारताला दृढ सहकार्याचे आश्वासन

पॅरिस – चीनने विश्वासघाताने घडविलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांप्रती संवेदना व्यक्त करुन फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी, पुढील काळातही भारताबरोबरील सहकार्य दृढ राहील असे आश्वासन दिले. काही दिवसांपूर्वीच फ्रान्सने भारताला आणखीन काही युद्धसज्ज रफायल विमानांचा पुरवठा करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर, फ्रेंच संरक्षणमंत्र्यांचे आश्वासन महत्त्वाचे ठरते.

India-France‘हल्ल्यात शहीद झालेले सैनिक हा सैन्यदलासह सैनिकांचे कुटुंबीय व देशासाठीही मोठा धक्का आहे. अशा कठीण परिस्थितीत फ्रान्स कायम भारताच्या पाठीशी उभा राहील. भारतीय लष्कर तसेच सैनिकांच्या कुटुंबीयांपर्यंत फ्रान्सच्या संवेदना पोहोचाव्यात अशी माझी नम्र विनंती आहे’, असे फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. फ्रान्स या क्षेत्रात भारताचा धोरणात्मक सहकारी आहे याकडे लक्ष वेधून, सहकार्य वाढविण्यासाठी भारताला भेट देण्याची आपली तयारी आहे, असे संकेतही फ्रेंच संरक्षणमंत्र्यांनी दिले.

या पत्राच्या पार्श्वभूमीवरच, भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी फ्रान्सच्या परराष्ट्र सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केल्याचे समोर आले आहे. चर्चेदरम्यान, फ्रान्सच्या सचिवांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताबरोबरील सहकार्य वाढविण्याची उत्सुकता दर्शविली, अशी माहिती सूत्रांनी दिली. संरक्षणमंत्री पार्ले यांचे पत्र व परराष्ट्र सचिवांनी केलेली चर्चा या पटना भारत व फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम होत असल्याचे संकेत देणाऱ्या ठरतात.

चीनबरोबरील वादाच्या पार्श्वभूमीवर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाढते समर्थन मिळत आहे. जगातील आघाडीच्या देशांनी या मुद्द्यावर भारताला फक्त पाठिंबा न देता विविध प्रकारचे सहकार्यही देऊ केले आहे. फ्रान्स हे त्याचे ठळक उदाहरण ठरते.

leave a reply